Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आमदार किशोर जोरगेवार यांची भूमिका म्हणजे “जिधर दम, उधर हम”





एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने चंद्रपूरकर संतप्त..

गेल्या २० जूनला राज्य विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये आवश्यक संख्याबळ नसतांनाही भाजपचे पाचही उमेदवार निवडणूक आले. या निवडणुकीत इतर अपक्षांसह मविआतील घटक पक्षांच्या आमदारांनीही भाजपला मदत केल्याचे बोलले जाते.
या निकालामुळे मविआतील अस्थिरता चव्हाट्यावर आली. परंतू अपक्षांसाठी घोडेबाजार शब्द वापरणे योग्य नाही. असे विधान करणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मात्र विधानपरिषदेत कुणाला मतदान केले असावे. हे अद्यापही अनुत्तरीतच आहे.

विधानपरिषदेच्या निकालानंतर मध्यरात्री राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घटना घडायला सुरवात झाली. शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या अनेक आमदारांसह अपक्षांना घेऊन सुरत गाठलं. आणि गेल्या दोन-तीन दिवसांपासुन ते आसाममधील गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन ब्ल्यू मधून राज्याची सत्ता उलथावू पहात आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत सद्यस्थितीत ३८ हून अधिक सेनेचे तर काही अपक्ष आमदार गुवाहाटीत आहेत. हा आकडा वाढतचं जाईल असाही दावा शिंदेकडून होतो आहे.

परंतू या सत्तानाट्यावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चंद्रपूरकर चांगलेच भडकले आहेत.
राज्यातील घडामोडींकडे अपक्ष आमदारांचे संपुर्ण लक्ष आहे, काय होऊ शकते किंवा नाही याचा विचार आम्ही करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आम्हाला काहीही संपर्क झालेला नाही, पण शिंदे गटाने संपर्क केला आहे. त्यामुळे माझी भूमिका ही जनतेची भूमिका राहणार आहे. मतदार संघाचा सर्वसमावेशक विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहणे गरजेचे असते. गुरूवारी सर्व बाबी तपासून व मतदार संघातील नागरीकांशी चर्चा करून मी एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अशी प्रतिक्रिया आमदार जोरगेवार यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
आणि काल टीव्हीवर ते गुवाहाटीतील शिंदे गटात सामील झाल्याचे दिसले.

यामुळे आमदार जोरगेवार यांचे कोणतेही निर्णय वा कृती किती स्वार्थी आणि तकलादू आहे. याची प्रचिती चंद्रपूरकरांना पुन्हा एकदा झाली आहे.
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूरकरांना “२०० युनिट वीज मोफत देण्याचे” गाजर दाखवून तत्कालीन भाजप आमदार नाना शामकुळे यांना ७२,१०७ मतांनी पराभूत करून जोरगेवार अपक्ष म्हणून निवडून आले.
चंद्रपूरकरांनी त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवला, त्यांना विधानसभेत पाठवलं पण चंद्रपूरकरांना दिलेले मोफत २०० यूनीट विजेचे आश्वासन मागील अडीच वर्षांपासून हवेत विरले आहे.
जोरगेवार प्रसिद्ध पत्रकातून सांगतात की, मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे आहे. पण त्यांचे हे वक्तव्य कीती पोकळ आहे हे चंद्रपूरकर चांगलेच जाणतात.
निवडून आल्यानंतर जोरगेवार ना. विजय वडेट्टीवारांशी हातमिळवणी करून मविआत गेले. सत्तेसोबत होते परंतू गेल्या अडिच वर्षात एकही मोठा निधी वा प्रकल्प त्यांना चंद्रपूरात आणता आला नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनवर त्यांनी गुवाहाटी गाठलं, तर मग याआधी याच नगरविकास मंत्र्याकडून चंद्रपूर महानगरपालिकेसाठी त्यांनी निधी का खेचून आणला नाही?

वास्तविक पाहता गेल्या अडीच वर्षांत जोरगेवारांची भूमिका नेहमीच संधिसाधू राहीली असून ती फक्त स्वतःच्या स्वार्थापुरती मर्यादित आहे.

या चांद्याच्या मातीने अनेक अपक्ष आमदार पाहिले आहेत. राजकारणातून कधिच हरवलेल्या सचोटी, सभ्यता आणि निस्वार्थपणाने जनतेसाठी जगलेली अपक्ष आमदारं या जिल्ह्यात झाली. अड. बाबासाहेब खानोरकर असतील किंवा संसदपटू अड. वामनराव चटप अपक्ष असुनही त्यांनी कधीही सत्ताधाऱ्यांचे पाय चाटले नाही. आपल्या विधिमंडळ संसदीय आयुधांचा त्यांनी उपयोग केला.
सत्तेच्या सोबत राहून मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकास साधता येतो अशी गोंडस प्रतिक्रिया देत झुकणारे ते आमदार नव्हते. तर सरकारच्या छाताडावर बसून आपल्या मतदारसंघासाठी आवश्यक निधी खेचून आणण्याची हातोटी त्यांना होती. जनतेचा विश्वास संपादन करून जनतेच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात आवाज बुलंद करणाऱ्या प्रत्येक आमदाराचे आज काम होते.
परंतू स्वार्थासाठी कधी “विजूभाऊ म्हणतील तसंच” म्हणतं वडेट्टीवारांच्या गोतावळ्यात रमणाऱ्या, कधी अजितदादा तर कधी पृथ्वीराज चव्हाणांबरोबर दिसणाऱ्या, तर ऐण राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांबरोबर मतदारसंघातील विकासाच्या बाता मारणाऱ्या, आणि कधी सेना तर कधी भाजप जिंदाबाद म्हणणाऱ्या आमदार जोरगेवारांची गत म्हणजे “जिधर दम, उधर हम” अशीच आहे. आणि हे जनतेला कळूनही आले आहे.
त्यामुळेच किशोर जोरगेवार यांच्या आमदारकीची पहिलीच टर्म ही शेवटची ठरेल! असा एक मतप्रवाह जनतेत ठाम होत चालला आहे.
आधी सत्ता येणार म्हणून देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देणारे आणि आता सत्तेसोबत म्हणून शिंदेगटात सामील झालेले किशोर जोरगेवार खरचं राजकीय परिपक्व आहेत काय? की नुसते “स्वार्थासाठी वाट्टेल ते!” अशी भुमिका त्यांनी घेतली आहे? असा संतापजनक प्रश्नही आता सामान्य चंद्रपूरकर विचारू लागले आहेत.

खरेतर, आमदार जोरगेवार हे चंद्रपूर मतदारसंघाच्या अनुसुचित जाती (राखीव) जागेवर निवडून आले आणि सत्तेच्या मलिंद्यासाठी हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिंदेगटाला जाऊन मिळाले. हे चंद्रपूरकर जनतेला आवडलेले नाही. निवडणुकीआधी स्वतःला दलित म्हणवणे आणि सत्तेसाठी आता हिंदुत्वाची कास धरणे हे किती तात्विक आहे? याचे उत्तर किशोर जोरगेवारांना जनतेला द्यावेच लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies