चंद्रपूर ब्युरो.
स्थानिक बिनबा गेट परिसरातून भरधाव वेगाने ट्रान्सपोर्टच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघातही झाले आहेत. याच परिसरात शाळा, कॉन्व्हेट असल्याने लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेवून ये-जा करावी लागते. त्यामुळे येथील नागरिकांना या वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरीता बिनबा गेट येथील राजू घटे यांच्या घरासमोर स्पीड ब्रेकर देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी एका निवेदनाच्या माध्यमातून मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भरधाव दुचाकी व चारचाकी तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या बाईक स्टंट करणारे टवाळखोर मुले यात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. ते मोठ्या प्रमाणात वेगाने वाहने पळवितात. याशिवाय ओव्हरलोड वाहनांवरही कुणाचाही अंकुश दिसून येत नाही. डबल व तिबल सीट वाहने दामटली जातात. याच भागात शाळा, महाविद्यालये इतर कार्यालये आहे. त्यामुळे 24 तास रस्त्यावर वर्दळ असते.
या मार्गावर अनेकदा अपघातही झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीची समस्या गभीर होत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी परिसरात स्पीड ब्रेकर देण्याची मागणी सचिन बोबडे व इतर वॉर्ड वासीयांनी उपमहापौर राहुल पावडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.