चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्रकुमार अमर-खोब्रागडे यांचे 7 जानेवारीला वयाच्या 79 व्या वर्षी नागपूर येथे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 9 जानेवारीला चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात शोकसभा घेण्यात आली. सर्वप्रथम स्वर्गीय देवेंद्रकुमार अमर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ स्थापन करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी छोटेसे रोपटे लावल्यामुळे आज वृक्ष मोठे उभे आहे. त्यांची पत्रकारिता ही सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार आत्मसात केल्यास त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, अशी भावना माजी अध्यक्ष संजय तुमराम यांनी व्यक्त केली. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात देवेंद्रकुमार अमर यांनी सलग तीन टर्म अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यांच्या जाण्याने सच्चा पत्रकार गमावला अशी भावना यावेळी व्यक्त केली.
यावेळी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली, सचिव बाळू रामटेके, ज्येष्ठ पत्रकार मोहन धनकर, आशिष अंबाडे यांनीही शोक भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. या कार्यक्रमाला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली, उपाध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, सचिव बाळू रामटेके, कोषाध्यक्ष प्रवीण बतकी, ज्येष्ठ पत्रकार मोहन धनकर, माजी अध्यक्ष संजय तुमराम, आशिष अंबाडे, रोशन वाकडे, प्रशांत देवतळे, रमेश कलेपेल्ली, गौरव पराते,गोलू बाराहाते, सुनील तायडे, निलेश डहाट, हैदर शेख, धनंजय साखरकर, मिलिंद दिंडेवार, चिन्ना बामनंटी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.