पुणे: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं निधन झालं आहे. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या.
मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.