चंद्रपूर, ता. १ येथील श्यामनगर परिसरातील नागरिक परिसरात सुरु असलेल्या वराह पालन आणि मांस विक्री व्यवसायामुळे त्रस्त आहेत. हा व्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी माजी झोन सभापती तथा नगरसेवक अजय सरकार यांच्याकडून अनेकदा करण्यात आली. मात्र, महापालिका प्रशासनाने या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमवारी (ता. १) नगरसेवक अजय सरकार यांच्या समर्थकांनी चक्क मनपा समोर डुकर सोडून संताप व्यक्त केला. या प्रकाराने मनपा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.
येथील श्यामनगर परिसरात सुरु असलेले वराह पालन आणि मांस विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. रस्त्याच्या लगत मांसविक्री केली जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शहरात डेंगी, मलेरिया व अन्य साथीचे आजार आहेत.
मांसविक्रीच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या व्यवसायावर बंदी घालण्याची मागणी नगरसेवक अजय सरकार यांनी मनपा प्रशासनाकडे अनेकदा केली. मात्र, प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आज थेट मनपात डुकर सोडून संताप व्यक्त करण्यात आला.