शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पुरंदरे घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. बाबासाहेब हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून दाखल होते.
शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा शिवशाहीर हरपला - आ. सुधीर मुनगंटीवार
शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने शिवचरित्राचा संदर्भ ग्रंथ हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
शिवशाहीर हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर लाखोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे कायम स्मरणात राहतील.शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेबांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या सहाय्याने वन्ही तो चेतवावा , चेतविता चेततो* या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ बाबासाहेबांनी दूर केली. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड श्रद्धा हे बाबासाहेबांचे बलस्थान . या बलस्थानाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्रासह अवघे विश्व जिंकले. नुकतीच वयाची शंभरी पूर्ण करणारे बाबासाहेब आमचा मानबिंदू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याची शोकभावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.