खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट
एसटी कामगारांकडून चंद्रपूर, गडचिरोलीसह राज्यातील काही भागात सुरू असलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दिवाळीच्या काळात नागरिकांच्या अडचणीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांकडून दुप्पटीच्या जवळपास भाडे घेत आहे. या लुटीकडे शासनासह परिवहन विभागाकडूनही लक्ष दिले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
गडचांदूर, ता. ६: दिवाळीत भाऊबिजेचा सण भाव बहिणीच्या अतुट बंधनातील नात्याचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रक्ताच्या नात्यासोबतच बहीण भावाच्या भावनिक नात्यालाही या सणामुळे वेगळीच ओळख मिळाली आहे. यावर्षी ऐन दिवाळीत महामंडळाच्या संपाने बहीण भावाच्या नात्यात विरजन पडण्याची परिस्थिती निर्माण
झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणाच्या भीतीने राज्य व केंद्र शासनाने अनेक प्रतिबंध लादले. मागीलवर्षीसुद्धा बहीण भावाला भाऊबीज पाहिजे त्या प्रमाणात साजरी करता आली नाही. अनेक बहिणींनी यावर्षी भाऊबीज मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची आणि बिजेच्या दिवशी बंधुरायाला ओवाळण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, ऐन दिवाळीत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भाऊबिजेलसा भावांना खडतर प्रवास करावा लागणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात बसशिवाय दुसरा पर्याय नाही. भाऊ आपल्या बहिणीच्या प्रतीक्षेत असणार आहे. सासरी असणाऱ्या मुलीला दिवाळीत भाऊबीजेच्या सणाला माहेरी काही दिवस घालवावे अशी इच्छा असते. परंतु यावर्षीसुद्धा ही अशा नैराश्यात बदलण्याची परिस्थिती आहे.