भद्रावती :
ऐतिहासिक प्राचीन नगरी भद्रावतीच्या गवराळा येथील मुळ रहिवासी असलेल्या गणेश महादेव डोंगे नामक तरुणाने चित्रपट सृष्टीत गरुड झेप घेतली आहे. गेल्या पाच वर्षांपासून गणेश मुंबईच्या चित्रपट सृष्टीत कार्यरत आहे. गणेशने सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केलेला सुर्यवंशी चित्रपट दिवाळीमधील बलिप्रतीदेला दि. ५ नोव्हेंबर रोज शुक्रवारला सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटसृष्टीत उत्तुंग यश संपादित केल्याबद्दल गणेश डोंगे यांचा काल दि. ८ नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तथा स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या मातोश्री जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमाताई यांच्या शुभहस्ते गणेश डोंगे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारा दाखल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देण्यात आले. सुषमाताईंनी यावेळी गणेश डोंगे यांना भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छायुक्त आशिर्वाद दिले. याप्रसंगी नाटय व चित्रपट कलावंत तथा दिग्दर्शक रमेश खातखेडे, गणेशचे वडील महादेव डोंगे, भालचंद्र वडस्कर, पी.जे.टोंगे, श्याम जिनिपेल्ली, भुमेश्वर वालोदे, गोपिचंद येलणे उपस्थित होते. येत्या काही दिवसात आपली जन्मभुमी असलेल्या भद्रावती नगरीसाठी काहीतरी विशेष कामगिरी करणार असल्याचे गणेश डोंगे यांनी सत्कार प्रसंगी सांगितले.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सुर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमार, कर्टिना कैफ, अजय देवांगण, रणविर सिंग, जैकी श्राफ, जावेद जेफरी, गुलशन ग्रोवर, कुमुद मिश्रा, सिकंदर खेर आणि अभिमन्यु सिंग यांनी प्रमुख भुमिका केलेल्या आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, गोवा, रामोजी फिल्मसिटी हैदराबाद, उटी व बँकाक इथे करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी, प्रॉडक्शन डिझाईनर ,भालेराव व कला दिग्दर्शक म्हणून भद्रावतीच्या गणेश डोंगे यांनी काम केले आहे. सध्या रणविर सिंग यांचा सर्कस हा चित्रपट व कभी आर कभी पार ह्या वेब सिरीजचे काम सुरू असल्याचे गणेश डोंगे यांनी सांगितले.
गणेश डोंगे यांनी यापूर्वी प्रदर्शीत झालेल्या दिलवाले, भिकारी, सेंटीमेंटल, धीट पतंगे, गोलमाल अगेन आणि सिंबा या चित्रपटासह महेश मांजरेकर दिग्दर्शित पॉवर या चित्रपटात सुध्दा सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे गणेश डोंगे यांनी भद्रावतीचे कलाकार असलेला संसारचक्र हा लघुचित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.