कला दिग्दर्शित ' सुर्यवंशी ' चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार
भद्रावती :- ऐतिहासिक प्राचीन नगरी भद्रावतीच्या गवराळा येथील मुळ रहिवासी असलेल्या गणेश महादेव डोंगे नामक तरुणाने चित्रपट सुष्टीत गरुड झेप घेतली आहे. गणेशने सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केलेला सुर्यवंशी चित्रपट येत्या दिवाळीमधील बलिप्रतीदेला दि. ५ नोव्हेंबर रोज शुक्रवारला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी हा चित्रपट गुडीपाढव्याच्या शुभ पर्वावर २४ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु तो कालावधी कोरोना संक्रमणाचा असल्याने त्यावेळी चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
या चित्रपटात अक्षय कुमार, कर्टिना कैफ, अजय देवांगण, रणविर सिंग, जैकी श्राफ, जावेद जेफरी, गुलशन ग्रोवर, कुमुद मिश्रा, सिकंदर खेर आणि अभिमन्यु सिंग यांनी प्रमुख भुमिका केलेल्या आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, गोवा, रामोजी फिल्मसिटी हैदराबाद, उटी व बँकाक इथे करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी, प्रॉडक्शन डिझाईनर ,भालेराव व कला दिग्दर्शक म्हणून भद्रावतीच्या गणेश डोंगे यांनी काम केले आहे. सध्या रणविर सिंग यांचा सर्कस हा चित्रपट व कभी आर कभी पार ह्या वेब सिरीजचे काम सुरू असल्याचे गणेश डोंगे यांनी दै. देशोन्नतीला सांगितले.
विशेष म्हणजे गणेश डोंगे यांनी आपण काहीतरी वेगळ कराव , हा निर्धार करून शिक्षण घेतांना कला क्षेत्रातील विषयाची निवड केली. गणेश डोंगे यांनी ए.टी. डी.आणि बी. एफ.ए. अम्लाईड आर्ट उपयोजीत कला व विविध कला क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केले आहे. गणेश डोंगे यांनी इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे शिक्षण जि.प. उच्च प्राथ. शाळा गवराळा येथे पूर्ण केले. इयत्ता ८ वी ते १० पर्यंतचे शिक्षण कर्मवीर विद्यालय गवराळा इथून घेतले. इयत्ता ११ व १२ पर्यंतचे शिक्षण लोकमान्य विद्यालय भद्रावती इथे घेतले. सिंदेवाही नवरगाव इथे ए.टी. डी आणि बी.एफ.ए.पर्यंतचे शिक्षण औरंगाबाद येथे घेतले. गणेशचे वडील रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झाले आहे.
गणेश डोंगे यांनी यापूर्वी प्रदर्शीत झालेल्या दिलवाले, भिकारी, सेंटीमेंटल, धीट पतंगे, गोलमाल अगेन आणि सिंबा या चित्रपटासह महेश मांजरेकर दिग्दर्शित पॉवर या चित्रपटात सुध्दा सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.