रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे अपघातासाठी कारणीभूत ठरत असून या खड्ड्यांमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.ही घटना राजुरा तालुक्यातील सोंडो या गावाजवळ आज सकाळच्या सुमारास घडली. पदमा सुधाकर मादनेलवार(५०) रा. गोवरी ता.राजुरा असे मृत महिलेचे नाव आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथून तेलंगणा राज्यात एका कार्यक्रमासाठी मुलगा चंद्रशेखर मादनेलवार व त्यांची आई पदमा मादनेलवार सकाळी दुचाकीने निघाले. दुचाकीने मुलासोबत जात असताना सोंडो गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पदमा मादनेलवार दुचाकीवरून खाली कोसळल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यांना देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोवरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.