आधी काम मग निविदा
संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हेची मागणी
प्रकरण उजेडात येताच अधिकाऱ्यांची सावरासावर सुरु
चंद्रपूर :- जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग-१ च्या अखत्यारीत असलेल्या शासकीय विश्रामगृहात सुमारे १६.५० लाख रुपये किमतीचे विशेष दुरुस्तीचे काम मजूर सोसायटी मार्फत निविदा प्रक्रिया न राबविताच करण्यात आल्याच्या गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणी बांधकाम विभागातील काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता दिसू लागली आहे .
या कामात झालेल्या गैरप्रकारात लपविण्यासाठी आता 22 ऑक्टोबरला ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचेही प्रकार उघडकीस आला आहे . हे संपूर्ण प्रकरण प्रकरण उजेडात येताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने खळबळ उडाली असून सारवासारव केली जात आहे .
सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक (१) ने शासकीय विश्राम भवनात सोफा, लायटिंग, पीओपी तसेच इतर काही कामे विशेष दुरुस्तीच्या नावाखाली केली असुन सुमारे १६.५० लाख रुपये या कामावर खर्च करण्यात आले .
टेंडर मॅनेज करण्यासाठी मजूर सहकारी सोसायटी मार्फत हे काम करण्यात आले. जवळपास तीन महिने चाललेल्या विशेष दुरुस्तीचे काम नुकतेच संपले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली नाही. निविदा प्रक्रिया न राबविता मजूर सहकारी सोसायटी कडे काम देऊन नियमाचा भंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केवळ व्यक्तिगत लाभासाठी जवळच्या ठेकेदाराला हाताशी धरून १६:५० लाख रुपये किमतीचे काम केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गीरहे यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने गैरप्रकार लपवीण्यासाठी निविदा प्रक्रिया न राबविता केलेल्या कामाची निविदा २२ ऑक्टोंबर ला वेबसाईटवर प्रकाशित केले. हा प्रकार म्हणजे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणारा असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी संदीप गिरहे यांनी केली आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस येतात सार्वजनिक विभागात विभागाच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव सुरू केली आहे.