चंद्रपूर :- कोळशाच्या उत्पादनात आणि वाहतुकीत कमालीची घट झाल्यानं राज्यातील वीज केंद्रे संकटात सापडली आहेत. राज्यातील विजेची मागणी वाढत असताना या संकटामुळे ती निम्म्यावर आली आहे.गेल्या महिनाभरापासून ही स्थिती कायम आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांशी कोळसा खाणी या भूतल आहेत. त्यामुळे पावसाचं पाणी त्यात साचतं आणि उत्पादन ठप्प होतं. ही स्थिती या पावसाळ्यात अनेकदा निर्माण झाली. त्यामुळे चंद्रपूर वीज केंद्राला आवश्यक कोळसा पुरवठा होऊ शकलेला नाही.
चंद्रपूर वीज केंद्राची कोळशाची मागणी 35 हजार टन प्रतिदिन एवढी आहे. मात्र हा पुरवठा होत नसल्याने इथले सातपैकी केवळ पाच संच सुरू आहेत. क्षमतेच्या निम्मी वीज निर्मिती सुरू आहे.
हीच परिस्थिती राज्यातील इतर औष्णिक वीज केंद्रांची आहे. केवळ एक ते दोन दिवस पुरेल एवढाच साठा सध्या वीज केंद्रांकडे शिल्लक आहे. त्यामुळं राज्यावरील वीज संकट चांगलंच गहिरं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.