चंद्रपुरातील व्यापाऱ्यांच्या बंदला पाठिंबा नाही
चंद्रपूर :- उत्तरप्रदेशातील लखीमपूरखिरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना बेकायदेशीर अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांची महाराष्ट्र बंद बैठक घेऊन बंदला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मांडली. मात्र, व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या बंदला पाठिंबा देता येणार नाही. नियमितपणे दुकाने उघडली जातील. बंदचे आवाहन करणारे प्रतिष्ठाणे बंद करण्यासाठी आले तर निश्चितपणे दुकाने बंदी केली जातील अशी भूमिका घेतली. त्यामुळे सोमवारचा बंद नेमका कसा राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचितघटना घडू नये, यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राजीव कक्कड, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, शहरप्रमुख प्रमोद पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीतील घटक पक्षाने केले आहे. हा राजकीय विषय असल्याने बंदला आपला जाहीर पाठिंबा नाही. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतही व्यापाऱ्यांनी हीच भूमिका मांडली. नेहमीप्रमाणे व्यापारपेठ सुरू करण्यात येईल. व्यापारपेठ बंद करण्यासाठी कुणी आले आणि विनंती केली तर त्यांच्या विनंतीला मान देऊन व्यापारपेठ बंद करू.
•रामकिशोर सारडा, अध्यक्ष - चंद्रपूर फेडरेशन ऑफ ट्रेड अॅण्ड इंडस्ट्रिज