■ एलसीबीची कारवाई
■ पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
■ ४ लाखांचा माल जप्त
■ आणखी काही मोठे मासे अडकणार
चंद्रपूर : राज्यात सुगंधित तंबाखू विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला असताना राजकीय आणि प्रशासकीय बळ मिळत असल्याने मागील दोन वर्षांपासून हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. चंद्रपूर शहरात या अवैध व्यवसायाने सर्व सीमा पार केल्या आहेत. दाताळा एमआयडीसीतील एका गोडाऊनमधून रात्रीच्या सुमारास या व्यवसायाचा खेळ चालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री ११ वाजता धाड घालण्यात आली असता घटनास्थळावरून सुमारे ४ लाख किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी वसीम झिंगरी याला बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सुगंधित तंबाखू विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. कोरोनाकाळात टाळेबंदीचा फायदा उठवत सुगंधित तंबाखू विक्रेत्यांनी या व्यवसायाला मोठे बळ दिले. राजकीय आणि प्रशासकीय बळ मिळाल्यामुळे सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यवसायाने साया सीमा पार केल्या. या व्यवसायावर अलिकडे कोणाचाही अंकुश राहिलेला नाही,
असे चित्र निर्माण झाले होते. याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अन्यथा आपल्या स्टाईलने आंदोलन करण्याचा अल्टीमेटम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना निवेदनातून दिला होता. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्याने या अवैध व्यवसायाविरूद्ध आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने पोलीस प्रशासनानेसुद्धा संदीप गिऱ्हे यांच्या निवेदनाची दखल घेवून सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर पाळत ठेवली.
एलसीबीच्या पथकाला दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरातील एका गोडावूनमधून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठवला जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री सुगंधित तंबाखू साठवून ठेवून असलेल्या गोडाऊनवर धाड घातली. या गोडाऊनमधून १९८ बोरी सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून, याची किंमत ४ लाख २० हजार रुपये आहे. रात्री ११ वाजतापासून सुरू झालेली कारवाई
बुधवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होती. हेगोडावून अवैध सुगंधित तंबाखू विक्रेता वसीम झिंगरीच्या मालकीचे असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. एलसीबीने धाड घातल्यानंतर याची माहिती अन्न व प्रशासन विभागाला सुद्धा देण्यात आली. त्यानंतर या विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. सकाळी ६ वाजताच्या दरम्यान, अन्न प्रशासन विभागाने पडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वसीम झिंगरीविरूद्ध कलम ३२८, २७२, १८८ तसेच फुड अॅण्ड ड्रग्स अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईची चाहूल लागताच वसीम झिंगरी कारवाईच्या भीतीने पसार झाला. मात्र, एलसीबीच्या पथकाने त्याचा शोध घेवून बुधवारी रात्री उशिरा त्याला अटक केली. या कारवाईमुळे सुगंधित तंबाखू विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. गेल्या वर्षी कोराना प्रादुर्भावामुळे पहिला लॉकडाउन लागला. मे २०२० मध्ये सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरूद्ध अन्न प्रशासना विभागाने मोठी कारवाई केली. त्यानंतरही आणखी काही मोठ्या कारवाया झाल्या. मात्र, कायद्याचा धाक राहिला नसल्याने सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची हिंमत वाढत चालली आहे. काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी तंबाखू विक्रेत्यांचे मोठे साटेलोटे असल्याची चर्चा आहे. राजकीय वरहस्त मिळाल्यामुळे वसीम झिंगरीने हा व्यवसाय चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात वाढविला. अन्न प्रशासन विभागातील अधिकारी आणि पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांसोबत त्याचे अर्थपूर्ण संबंध असल्याचेही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, पोलीस हवालदार संजय अतकुलवार, गोपाल अतकुलवार, नितीन रायपुरे, रवि पंधरे यांच्या पथकाने केली.