चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरच्या वतीने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे १५ व १६ ऑक्टोबर रोजी दरवर्षी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. परंतु, मागील वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील कोविडमुळे वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणारा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ व त्या अनुषंगाने होणारे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत. तसेच याबाबत संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागितेले आहे.
या समारंभानिमित्त दरवर्षी लाखो बांधव उपस्थित असतात. परंतु, लक्षावधी जनतेच्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग सर्व बांधवांना होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरतर्फे १५ व १६ ऑक्टोबर रोजी सर्वांनी आपापल्या घरीच बुद्धवंदना घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी स्मारक समितीनेसुद्धा विजयादशमीला होणारा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा रद्द केलेला आहे. यावर्षी पवित्र दीक्षाभूमी चंद्रपूर येथे कोणाताही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याने दरवषीप्रमाणे कोणतेही दुकान व स्टॉल यांना परवानगी देता येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकातून आयोज समितीने कळविले आहे.