Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर मनपा स्वच्छतेत अग्रेसर ही गौरवाची बाब - आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश, पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धेतील पारितोषिक आणि माझी वसुंधरा अभियान विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस


चंद्रपूर, ता. १९ : स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असून, राज्यातील २७ महानगरपालिकेत स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला असता चंद्रपूर शहर महानगरपालिका पहिल्या तीनमध्ये समाविष्ट आहे, ही गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष व माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारी रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश, पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धेतील पारितोषिक आणि माझी वसुंधरा अभियानअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा १९ ऑक्टोबर रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

मंचावर प्रमुख पाहुणे समाजसेवक अनिकेत आमटे, महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, गटनेत्या जयश्री जुमडे, महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पा उराडे, उपसभापती शितल कुळमेथे, झोन क्र. १ च्या सभापती छबूताई वैरागडे यांची उपस्थिती होती.


यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, स्वच्छता अभियानामध्ये तालुकानिहाय, शहर व गावनिहाय झालेले काम व आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर येईल. तसेच भविष्यात देशातसुद्धा चंद्रपूर जिल्हा अव्वल क्रमांकावर अवश्य येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी रमाई घरकुल योजनेचा उल्लेख करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, अर्थमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीत मी घरांसाठी जास्त निधी उपलब्ध करायचो. तसेच मागील १० वर्षांत आपण रमाई घरकुल योजनेअंतर्गत ७५०० घरे मंजूर केल्याचा दाखलाही त्यांनी दिला. चंद्रपूर शहर महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकारी यांनी रमाई योजनेत उत्कृष्ट काम केले. २०३५ मंजूर घरांपैकी उर्वरित ५०४ घरे १४ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे, अशी सूचना त्यांनी केली. महापालिकेच्या पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा या उपक्रमाचे कौतुक करतानाच आज सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप व उद्देश भरकटल्यामुळे पर्यावरणपूरक उत्सव व वर्तन करण्याची गरज आ. मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली. ५०० वर्षांचा इतिहास असलेल्या पुरातन चंद्रपूर शहराचे ऐश्वर्य व समृद्धीत भर पडेल असेच पर्यावरणस्नेही वर्तन नागरिकांनी अंगीकारावे व शहराच्या विकासात व्यक्तिशः सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, चंद्रपूर शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्यासाठी मनपा सातत्याने उपक्रम घेत आहे. यात आणखी भर घालण्यासाठी स्वच्छतादूत म्हणून अनिकेत आमटे यांची निवड करण्यात आली, ही चंद्रपूरसाठी गौरवाची बाब आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी आपल्या प्रास्तविकपर भाषणात महानगरपालिकेद्वारे राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा संक्षिप्त आलेख सादर केला. तसेच चंद्रपूर शहर प्रदूषणमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत रमाई घरकुल योजनेमुळे अनेक गरीब कुटूंबाना हक्काचे घर उपलब्ध झाले. या योजनेतील निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या धनादेश वितरित करण्यात आले.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा घेण्यात आली. यात घरगुती गणेश उत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यातील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळातील प्रथम क्रमांक : श्री. नवयुवक बाल गणेश मंडळ, व्दितीय क्रमांक : भाऊ गणेश मंडळ, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर, तृतीय क्रमांक : सार्वजनिक गणेश मंडळ, सिव्हिल लाईन यांना देण्यात आला. घरगुती गणेश उत्सव स्पर्धेत झोन क्र. १ प्रथम क्रमांक : किशोर सुधाकरराव माणुसमारे, झोन क्र. २ प्रथम क्रमांक : डॉ. ममता अरोरा, झोन क्र. ३ प्रथम क्रमांक : प्रणय विटेकर यांच्यासह द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर मनपाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण झाले. यात एकूण ३० जणांचा गौरव करण्यात आला.

स्वच्छतादूत अनिकेत आमटे यांचा सत्कार
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त स्वच्छतादूत (ब्रँड अँबेसेडर) व प्रसिद्ध समाजसेवक अनिकेत आमटे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात हा बहुमान व काम करण्याची संधी दिल्याबद्दल महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले तसेच महानगरपालिकेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा मनोदय व्यक्त केला. तत्पूर्वी मनपाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह आणि बांबूची गणेशमूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies