वरोरा :- अंधश्रद्धा, दारूबंदी, कूटूंबनियोजन, निरक्षरता, व्यसनाधिनता आदी वाईट चालीरीती समाजात फोफावत आहे. या सामाजिक समस्यांवर आपल्या गोंधळ आणि नकलांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे काम वरोरा तालुक्यातील भटाळा येथील जय भवानी गोंधळ मंडळ करीत आहे.
वीस वर्षापूर्वी वेगवेगळ्या गावातील काही समविचारी मंडळी एकत्र आली. त्यांनी भवानी गोंधळ मंडळाची स्थापना केली. त्यानंतर ते गोंधळाचे कार्यक्रम करू लागले. त्यांना उत्तम असा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागला. काळानुसार या गोंधळी मंडळींनी आपल्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलविले. त्यांनी समाजातील ज्वलंत सामाजिक समस्यांना लक्ष केले. गोंधळात त्यांनी नृत्य, नकला, पोवाडे, समाजप्रबोधनात्मक गितांचा समावेश केला. त्यामुळे त्यांचे बहारदार कार्यक्रम होऊ लागले.
या भवानी मंडळात राजकुमार शेंडे, अनंता दाते, बापुराव पाटील, ईश्वर वानकर, अरूण नन्नावरे, फाल्गुन बैले, विठ्ठल नन्नावरे, रविंद्र पसारे हे कलाकार आहेत. सारेच जण आपआपले वेगवेगळे पात्र निभवतात. बापुराव पाटील हे अनेक सामाजिक समस्यांवर नकला करून प्रेक्षकांना हसवितात. ईश्वर वानकर उत्तम ढोलक मास्टर आहे. अरूण नन्नावरे हे उत्तम संबड वाजवितात. रविंद्र पसारे आणि विठ्ठल नन्नावरे हे नेहमीच महिलांचा वेष परीधान करून उत्तम नृत्य करतात. राजकुमार शेंडे आणि अनंता दाते हे पोवाडे तसेच समाजप्रबोधनात्मक गिते गातात. त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होते. तसेच ते कथेचे विश्लेषणही छान करतात.
भवानी मंडळाचे कलाकार आपल्या कलाकृतीतून काही प्रमाणात का होईना समाजात थैमान माजविलेल्या समस्यांना मुठमाती देण्याचे काम करीत आहे.
अरूण उमरे