एका इसमासह १८ जनावरांचा मृत्यू
भिसी : येथून सहा किमी अंतरावर असलेल्या चिंचोली बस स्टॉपजवळ २९ आक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास टिप्परची धडक लागून ३३ गाई भरून कत्तलखान्यात जात असलेला ट्रक उलटला. यात एक इसम व १८ गाई ठार झाल्या तर एक इसम व १५ गाई जखमी झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरवरून ३३ गाई भरून भिसीमार्गे उमरेड व्हाया अमरावती जाणारा ट्रक क्रमांक एमएच ४० / बीजी ६६१७ तसेच नागपूरकडून गिट्टी भरून येत असलेला टिप्पर क्रमांक एमएच ४० / बीजी ९२१६ या वाहनांची चिचोली बसस्थानकाजवळ परस्परांना धडक झाली. या अपघातात गाई भरून असलेला ट्रक उलटला. यात सलमान शेख कुरेशी (२२) रा. टेकानाका नागपूर याचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक चालक मोहम्मद इर्शाद कुरेशी (२८) रा. कांदीवाडा (मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला तर टिप्पर चालक व वाहक पसार झाले. घटनेची माहिती मिळताच भिसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जंगम सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून जखमी गाईंना तपोभूमी गोंधोडा येथील गोशाळेत पाठविण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जंगम करीत आहेत.