जिल्ह्यात 41 ठिकाणी सट्टा असून त्याचे शहरात 5 अड्डे सुरू
जिल्ह्यात 11 ठिकाणी जुगाराचे क्लब असुन चंद्रपूर व कोरपना इथे प्रत्येकी 3 क्लब सुरू असल्याची पालकमंत्र्यांना खात्रीशीर माहिती
चंद्रपूर :- जिल्ह्यात अवैध व्यवसायांना ऊत आला असून याबद्दलची तक्रार सर्वसामान्य नागरिकांकडूनही केली जाऊ लागली आहे. सट्टा, अवैध मार्गाने येणारा तंबाखू-गुटखा, जुगाराचे क्लब हे संपूर्ण जिल्ह्यात बिनबोभाटपणे सुरू असून याबाबत पोलीस कारवाई का करीत नाही असा प्रश्न विचारला जात होता.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सर्व अवैध व्यवसायांवर एका महिन्याच्या आत आळा घाला असे आदेश दिले असल्याचे सांगितले. पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे तसेच पोलीस अधीक्षकांशी याबाबत आपली चर्चा झाली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या चर्चेदरम्यान आपण सर्व प्रकारचे अवैध व्यवहार बंद करण्याचे कडक निर्देश दिल्याचे ते म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यात 41 ठिकाणी सट्टा खेळला जात असल्याचे सांगितले जाते. सर्वाधिक सट्टा हा चंद्रपुरात खेळला जात असून त्याचे शहरात 5 अड्डे असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात 11 ठिकाणी जुगाराचे क्लब सुरू असून चंद्रपूर आणि कोरपना इथे प्रत्येकी 3 क्लब सुरू असल्याची खात्रीशीर माहिती आहे. क्लबमध्ये जुगार खेळण्यावर बंदी आहे, पण बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून क्लबची मान्यता मिळवून तिथे जुगार खेळवला जात आहे. अवैध दारू, तंबाखू यांचेही प्रमाण जिल्ह्यात वाढले असून त्याला वेसण घालण्याची हिम्मत दाखवणार का असा प्रश्न नागरीक विचारू लागले होते. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर या अवैध प्रकारांना आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.