Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी वापरून बेरोजगारांना लाखोेंनी गंडविले
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील विविध विभागात वर्ग-३ च्या नोकरीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी वापरून बनावट आदेश दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बल्लारपुरातील एका व्यक्तीकडून हा प्रकार करण्यात आला असून, त्याने जिल्हाभरातील २० ते २५ युवकांना लाखो रुपयांनी गंडविल्याची माहिती असून, जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान, सोमवारी हा प्रकार उजेडात आल्यानंतर मंगळवारी जिल्हा परिषदेकडून रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी मूळ आदेश मागितल्याने पुन्हा बुधवारी आदेश जमा करून तक्रार दिली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकारामुळे जिल्हा परिषद चांगलीच हादरली असून, नोकरीचे बनावट आदेश देणारी टोळी सक्रीय असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या गेल्या असून, मिळेल ते काम युवक करण्यासाठी तयार होत आहेत. अशातच बल्लारपूरच्या एका व्यक्तीने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहाय्यक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश माथी मारले. जिल्हा परिषदेत या प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया राबविली गेली नसताना २०१९-२० या आर्थिक वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तयार करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी दोन ते तीन युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट घेवून बनावट आदेश दाखविल्यानंतर त्यांनाही धक्काच बसला. बनावट आदेश देवून फसवणूक झालेले आणखी २० ते २२ युवक असल्याची माहिती त्या युवकांनीच सीई ओंना देत बल्लारपुरातील एका व्यक्तीने हा गोरखधंदा केल्याचेही सांगितले. मात्र, एवढे गंभीर प्रकरण असताना जिल्हा परिषदेनेही तात्काळ निर्णय न घेता एक दिवसानंतर मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी अधिकारी पोहचले. परंतु, पोलिसांनी मूळ कागदपत्र मागितल्याने या प्रकरणाच्या तक्रारीसाठी बुधवारचा दिवस उजाडणार आहे. जिल्ह्यातील २० ते २२ युवक बल्लारपुरातील त्या व्यक्तीच्या जाळ्यात फसले असून, प्रत्येकाकडून ६ ते २० लाखापर्यंतची रक्कम उखळली आहे. दरम्यान, २०१९- २० या आर्थिक वर्षात हे बनावट आदेश दिल्यानंतर तब्बल एक वर्ष काही युवकांनी नोकरीची वाट बघितली. परंतु, आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहानिशा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठले असता नोकरीच्या बनावट आदेशाचा पर्दाफाश झाला आहे. फसगत झालेल्या व्यक्तींमध्ये शासकीय

कार्यालयात ७ ते ८ वर्ष काम केलेला एक व्यक्तीसुद्धा असल्याची माहिती सीईओ डॉ. मित्ताली सेठी यांनी 'पुण्य नगरी'शी बोलताना दिली. दरम्यान, जिल्हा परिषदेत घडलेला नोकरीच्या बनावट आदेशाचा हा खळबळजनक प्रकार पोलीस किती गंभीरपणे घेतात, याकडे लक्ष लागले आहे. सोमवारी आलेल्या युवकांनी बल्लारपूरच्या व्यक्तीचे नाव सांगितले असले तरी अशा प्रकारचे बनावट आदेश देणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय असण्याची दाट शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies