स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
युवा नेत्यांच्या सानिध्यात राहणारे ते अजूनही चर्चेत
वरोरा : सध्या आयपीएलचे क्रिकेट सामने सुरू असून, या खेळावर वरोरा तालुक्यातील शेगाव येथे सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात वेगवेगळी पथके तयार करून शेगाव येथे धाड टाकून नवीश नरडसह चौघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे स्थानिक शेगाव पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
मात्र युवा नेत्यांच्या सानिध्यात राहणारे चंद्रपुर शहरातील आशिष, आसिफ, राजीक, नीरज, धीरज, अविनाश व भद्रावतीमध्ये अरविंद आणि राजुरामध्ये भगत यांची चर्चा
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आयपीएल क्रिकेटवरील सट्टेबाजांची माहिती काढून छापे टाकण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवेगळी पथके तयार करून धाडसत्र सुरू केले आहे. दरम्यान, शेगाव येथील नवीश देवराव नरड हा अबूधाबी येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर लोकांकडून पैसे घेवून जुगार खेळवित असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून धाड टाकली असता चार जण सट्टा चालविताना आढळले. त्यांना ताब्यात घेवून मोबाईल, टीव्ही, नगदी रक्कम व जुगाराचे इतर साहित्य असा ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नवीश देवराव नरड (४२), सूरज शंकर बावणे (२९), नितीन तात्याजी उईके (३५) व हरीदास कृष्णा रामटेके (४०) या चौघांना अटक करण्यात आली असून, शेगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. दरम्यान, शेगावमध्ये पोलीस ठाणे असून, त्या गावातच मोठ्या प्रमाणात आयपीएलवर सट्टा खेळला जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केल्याने शेगाव पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.