चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरातील घटना
चंद्रपूर : चंद्रपुरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसा खाण परिसरात पावसासोबत साबणाच्या फेसासारखा फेस पडल्याचे वेगळेच चित्र बघायला मिळाले. झाडांवर-गवतावर-रस्त्यावर अनेक ठिकाणी हा पुंजक्याच्या स्वरूपातील फेस नजरेस पडला आहे. काही भागात तर या फेस पुंजक्यांचा वर्षाव बघायला मिळाला. सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिसरात हा फेस पसरला आहे. ज्या भागात फेस पडला, त्या भागात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कोळसा खाणी आहेत.(Chemical foam falling from the sky)
औष्णिक वीज केंद्र आणि कोळसा खाणीतून निघणाऱ्या वायू प्रदूषणासोबत पावसाच्या पाण्याचे संयुग झाल्याने हा फेस तयार झाल्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा फेस पावसासोबत पडल्याने परिसरात चर्चेला पेव फुटले. दरम्यान, हा फेस घेऊन पर्यावरण अभ्यासकांनी चंद्रपूरचे प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. मात्र, यात धक्कादायक खुलासा झाला. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अशा पद्धतीच्या रासायनिक पृथ:क्करणाची कुठलीही व्यवस्था नसल्याचे उघड झाले.
चंद्रपूर शहर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. या शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय कार्यालय आहे. मात्र, या कार्यालयात अशी कुठलीही व्यवस्था नसणे, हे धक्कादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. आम्लवर्षा चंद्रपूरसाठी नवी नाही. याआधीही चंद्रपुरात तुरळक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. मात्र फेसयुक्त पुंजके थेट पावसासोबत जमिनीच्या पृष्ठभागावर पडल्याने हा नक्की काय प्रकार आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.