Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

40 दिवसांत 5 लक्ष 33 हजार नागरिकांचे लसीकरणआतापर्यंत जिल्ह्यात 12 लक्ष नागरिकांनी घेतली लस

चंद्रपूर दि. 13 सप्टेंबर : कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘कोव्हीड प्रतिबंधात्मक लस’ हे एक प्रभावी अस्त्र आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. सुरवातीला कमी असलेला लसीकरणाचा वेग आता चांगलाच वाढला असून केवळ 40 दिवसांत (1ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2021) जिल्ह्यात 5 लक्ष 33 हजार 323 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 12 लक्ष 7 हजार 618 नागरिकांनी लस घेतली आहे.
(Vaccination of 5 lakh 33 thousand citizens in 40 days)

जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 रोजी कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ झाला. सुरवातीला लसींचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने तसेच नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने लसीकरणाची गती संथ होती. मात्र जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जिल्हा टास्क फोर्सची नियमित बैठक घेणे सुरू केले. यात लसीकरणाची गती वाढविणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदींबाबत अधिका-यांना निर्देश दिल्याने जिल्ह्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात झाली.

विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात लसीकरण मोहिमेने गती पकडली असून 1 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील 268 केंद्रावर 5 लक्ष 33 हजार 323 जणांना लस देण्यात आली. यात सर्वाधिक लसीकरण 4 सप्टेंबर रोजी 45699 जणांना, यानंतर 9 सप्टेंबर रोजी 45440 जणांना, 11 सप्टेंबर रोजी 44263 जणांना, 31 ऑगस्ट रोजी 43704 आणि 23 ऑगस्ट रोजी 39720 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 16 लक्ष 41 हजार 830 नागरीक लसीकरणासाठी पात्र आहेत. यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील 9 लक्ष 68 हजार 948 जण, 45 ते 60 वर्षे वयोगटातील 4 लक्ष 48 हजार 586 जण तर 60 वर्षांवरील 2 लक्ष 24 हजार 296 नागरिकांचा समावेश आहे. यापैकी जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 12 लक्ष 7 हजार 618 जणांनी लस घेतली आहे. यात पहिला डोस घेणारे 9 लक्ष 35 हजार 51 तर दुसरा डोस घेणा-या नागरिकांची संख्या 2 लक्ष 72 हजार 567 आहे.

तापामध्ये लस न घेण्याचा सल्ला : कोरोना प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. पात्र नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन स्वत:चे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे. मात्र ताप असल्यास लस घेऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies