Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

निसर्गरम्य परिसरानी नटलेला जांभुळधरा धबधबा करतोय मनाचा थकवा दूर!

येताय ना जांभुळधरा धबधबा बघायला....तुमची वाट बघतोयं तो -अरूण उमरे

पावसाळी पर्यटन म्हटलं की आपल्याला चिखलदरा, पचमढी ही स्थळं डोळ्यासमोर उभी राहतात. चंद्रपूर जिल्हा विचारात घेतला तर मुक्ताई धबधबा, घोडाझरी डॕम, आसोलामेंढा तलाव आदी ठिकाणं आठवतात. पण निसर्गाने भरूभरून उधळण केलेला जिवती-कोरपणा परिसर लक्षात येत नाही. लोकप्रतिनीधी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा परिसर दुर्लक्षित आहे. चार दिवसापूर्वी कोरपना तालुक्यातील अंधारात असलेल्या जांभुळधरा परिसरातील धबधब्यांना भेटी देत आनंद लुटला. जिल्ह्यातील तसेच बाहेरील हौशी पर्यटकांनी मनाचा थकवा दूर करण्यासाठी भेट द्यावी, असाच हा जांभुळधरा धबधबा परिसर आहे.
या परिसरात चार दिवसापूर्वी जाणे झाले होते. त्याचा अनुभवच याठिकाणी सांगणार आहे. सर्वप्रथम आम्ही कोरपना तालुक्यातील जेवरा गावाजवळील खडक्या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटला. मेहंदी धबधबा यापूर्वीच बघितल्याने त्याला वाकुल्या दाखवत परसोडाजवळील महाराष्ट्र-तेलंगणा या राज्य सीमेवर पोहचलो. त्यानंतर सीमेवरून माघारी फिरत जेवरा-शिवापूर-मांगलहिरा-उमरहिरा या गावांना मागे टाकत जांभुळधरा या गावात पोहचलो.
निसर्गरम्य परिसरात वसलेलं आणि अतिदुर्गम भागात असलेलं जांभुळधरा हे ३५ घरांचं गाव बघून मन अगदी भारावून गेलं. अगदी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावावर निसर्गाची अस्सिम कृपाच असल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही दोघेही बापलेकं गावात शिरलो. तिथं रणजित शेडमाके या युवकाशी भेट झाली. त्याला धबधब्याविषयी माहिती विचारली असता रणजितने सांगितलं, या परिसरात सहा-सात धबधबे आहेत. ही ठिकाणं गावापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर जंगलात आहे. ही धबधबे पाहण्यासाठी पाच-सहा तासाचा कालावधी लागत असल्याची माहिती रणजितने दिली.अखेर पोहचलो धबधबा परिसरात!

रणजित आणि त्याच्या एका मित्रासोबत कोमल आणि माझा धबधबा पाहण्यासाठीचा जंगलातून खडतर प्रवास सुरू झाला. चारही बाजूंनी असलेले डोंगर, उंच झाडे, झुळझुळ वाहणारे छोटे ओहोळ, झाडांच्या वेलीची झालेली झोके हे प्रवासात आमचे मनोरंजन करीत होती. पायदळ प्रवास करताना फारच मजा येत होती. दोन किलोमीटर अंतर पार करीत आम्ही सर्वजण धबधब्याजवळ पोहचलो. उंच पहाडाच्या कपारीतून पडणारे धबधब्याचे पाणी फेसाळ रूप धारण करीत नाल्यात पडत होते. आणि खळखळ आवाज करीत वाहत जात होते. धबधब्याचे रूप डोळ्यात साठवत त्याला मोबाईलच्या कॕमेरामध्ये कोमलनी कैद केले. रणजित आणि त्याच्या मित्राच्या मदतीने आम्ही दोघेही धबधब्याचे जिथून पाणी पडते त्याठिकाणी चढलो. दगडावरून वीस-तिस फूट चढणे मोठे जिकरीचे काम होते. त्याठिकाणी ओले होत स्वच्छंदी जीवनाचा मनमुराद आनंद लुटला. एकंदरीत धबधब्याच्या रूपाने आनंद गगणात मावेनासा झाला. या जांभुळधरा वनपरिक्षेत्र परिसरात सात छोटे-मोठे धबधबे आहेत. सातही धबधबे ओंसडून वाहत असल्याची माहिती रणजीतनी दिली. वेळेअभावी या धबधब्यांकडे जाता आले नाही. ही धबधबे जंगलात तीन-चार किलोमीटरच्या अंतरावर आहेत.


असा गाठाल जांभुळधरा धबधबा!

जांभुळधरा परिसरात जायला कुठलंही साधन नाही. आपल्या खाजगी वाहन किंवा दुचाकीनेच येथे जावे लागते. येथे जाण्यासाठी कोरपना येथून तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग कोरपना-कन्हाळगाव-चनई(बु.)-मांडवा-टांगाळा-जांभुळधरा असा १५ किलोमीटर अंतराचा आहे. दुसरा मार्ग कोरपना-पारडी-रूपापेठ-खडकी-जांभुळधरा हा ही १५ किलोमीटर अंतराचाच आहे. आणि तिसरा मार्ग कोरपना-पारडी-मेहंदी-दुर्गाडी-शिवापूर-मांगलहिरा-उमरहिरा-जांभुळधरा असा २५ किलोमीटर अंतराचा आहे. या मार्गानी गेल्यास जेवरा या गावाजवळील खडक्या धबधबा, मेहंदीजवळील बोदबोधी धबधबा आणि उमरहिरा परिसरातील धबधबे बघता येतात. त्याचबरोबर येथे जातांना दुर्गाडी फाटा ते जांभुळधरा परिसरातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो. जांभुळधरा गाव गाठल्यानंतर स्थानिकांची मदत घ्यावी लागते. त्यांना ठरलेले मानधन देऊन धबधबे बघता येतात.
मार्ग दाखवण्यापासून विकासाची सुरूवात!

जांभुळधरा वनक्षेत्र परिसरातील धबधबे अंधारात आहेत. ज्यांना निसर्ग सौंदर्याची आवड आहे, असे अनेक पर्यटक दुरवरून येथे येत असतात. नेमका धबधबा कुठं आहे, याची माहिती त्यांना नसते. आदिलाबाद रोडवर धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गाची साधी एक पाटी नाही. त्यामुळे हौशी पर्यटक नेहमीच चाचपडतात. लोकांना विचारत-विचारत त्यांना धबधब्याचे ठिकाण गाठावे लागते. विकासाची सुरूवातच पर्यटकांना मार्ग दाखवण्यापासून होते. त्यामुळे स्थानिक प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींनी आदिलाबाद मार्गावर धबधब्याचा मार्ग दाखविणारे फलक लावावे, असे वाटते. पर्यटकांच्या सोयीसाठी साधनांची व्यवस्था करणे. त्याचबरोबर या स्थळांचा विकास करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. भविष्यात या स्थळांचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत गावाच्या महसुलात वाढ होऊ शकते. केवळ विकासाची नजर हवी, असे वाटते.
हा जांभुळधरा परिसर प्रदूषण विहरीत आहे. जिल्ह्यातील अनेक हौशी पर्यटक या भागात येऊन निसर्गाचा आनंद लुटतात. इतरांनीही याठिकाणी येऊन मनमुराद आनंद लुटावा, असे वाटते. मग येताय ना जांभुळधरा धबधबा बघायला....तुमची वाट बघतोयं तो...

अरूण उमरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies