भीक नव्हे अधिकार
कुणबी समाजाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक मागासलेपण लक्षात घेऊन स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकारने वरील सर्व क्षेत्रात खास बाब म्हणून आरक्षण दिले होते परंतु स्वातंत्र्यानंतर आलेल्या सर्व राजवटींनी महाराष्ट्र व संपूर्ण देशात काळ्या आईची सेवा करत असलेल्या या मोठ्या समाजाला वगळून प्रगतीपासून वंचित केले उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांसाठी दिलेले अधिकार प्राप्त करू न देता एकीचे भान नसलेल्या कुणब्यांच्या अधिकारात अनेक जाचक कायद्याचे अडथळे उभे करून ३५० च्या वरती असलेल्या ओबीसी समाजामध्ये ढकलून बेदखल केले.
स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षात संसद व विधान भवनात योग्य प्रतिनिधित्व नसल्याने कुणबी समाज सामाजिक न्यायापासून वंचित राहिला परिणामी आज या समाजाला व बहुजन समाजाला भयानक बेरोजगारी व कमालीची बिकट आर्थिक परिस्थिती, निसर्गनिर्मित संकटे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिकार व्हावे लागले त्यामुळे समाजात कमालीचा असंतोष व असुरक्षितता निर्माण झाला आहे. अशा उद्भवलेल्या परिस्थितीत 'मराठा आरक्षण' व पेसा कायद्यामुळे ओबीसीचे गेलेले आरक्षण यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. यापूर्वी कुणबी सेनेने आरक्षणाचा मुद्दा विराट सभा व समन्वय याद्वारे सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांचे समोर राज्य व राष्ट्रीय स्तरावर अधिक आक्रमकतेने सातत्याने मांडला आहे. कुणबी सेनेच्या व्यासपीठावर पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री व कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य, त्रिपुरा चे मुख्यमंत्री श्री. माणिक सरकार महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार, काँ.आयचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, भूतपूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे राष्ट्रीय भूतपूर्व अध्यक्ष श्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, बहुजन नेते मा. प्रकाशजी आंबेडकर व विद्यमान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले यांनी कुणबी सेनेच्या व्यासपीठावर येऊन व सुसंवाद ठेवून कुणबी सेनेने उभारलेल्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्यासाठी फार मोठा वैचारिक ठेवा दिलेला आहे व त्यांचा आदर्श ठेवून आपण कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली आज यशस्वी वाटचाल अथकपणे सुरू ठेवलेली आहे. सद्यस्थितीत आरक्षणाच्या बाबतीत राज्यशासनाचा एखादा जरी निर्णय चुकीचा झाला तर बहुजन समाजाच्या अनेक पिढ्या बरबाद होतील, त्यामुळे आपल्या संघटनेला, आपल्यावर व स्वतःला कुणबी समजणाऱ्या विचारवंतांवर व प्रत्यक्ष लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर फार मोठी राष्ट्रीय जबाबदारी आहे त्यामुळे देशातील राजकीय, सामाजिक आर्थिक, कृषी व सहकार क्षेत्रातील संतुलन बिघडू न देणे ही आपली नैतिक जबाबदारी राहणार आहे. आजवर आपण बहुजन एकीच्या बळावर शोषित समाजासाठी अनेक लढे उभारून ते यशस्वी केले आहेत त्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठी लढणे हे आपले परम कर्तव्य आहे त्यामुळे सामाजिक जनजागृती व या विषयाची आगामी वाटचाल याबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारून आलेल्या 'कोरोना' संकटाचा सामना धाडसीपणे करून कार्यरत होऊया व बहुजन हितासाठी आरपारची लढाई धर्म, जातीपाती च्या भिंती तोडून यशस्वी करण्याचे आहे आव्हान स्वीकारू या.
महिला युवक वारकरी संप्रदाय कृषी आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांचे योगदान आवश्यक आहे.
आपला,
विश्वनाथ पाटील
कुणबी सेना प्रमुख
महाराष्ट्र राज्य