सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
चंद्रपूर :- शहरात तथा जिल्ह्यात मोठ्या संख्येने परलैंगिक समूह राहत असून अद्यापपर्यंत त्यांना हिण वागणून मिळत असून अत्यंत वाईट जीवन जगावे लागत आहे. ही आपल्या समाजासाठी दुर्दैवाची बाब आहे. भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक घटकाला समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न केला असताना एखादया समूहाची होणारी हेळसांड बघवत नाही.
समूहातील प्रत्येक व्यक्तीला शासन तथा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा आपण प्रयत्न करावा. त्यांची ओळख निश्चित करून ज्याप्रमाणे मध्यप्रदेश शासनाने त्यांना ओळख प्रमाणपत्र दिलेले आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा द्यावे. तसेच त्यांचे बँक खाते उघडून त्यांना दरमहा मानधन (direct) benefit transfer) देण्यात यावे व त्यांना इतर महामंडळा सारखे अर्थसहाय्य मिळावे यासाठी देखील आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न करावे. परलैंगिक व्यक्तींना शासकीय जागेवर रहिवास म्हणून घरकुल बांधून देण्यासाठी प्रयत्न व्हावा व शासन प्रशासन हे उपेक्षित घटकांच्या केवळ मागे उभे राहत नाही तरत्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करते हे दाखवून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदना द्वारे केली.