भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांची गडचांदूर न.प. मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार !
गडचांदूर (वि.प्रति.)
कोरपना तालुक्यातील गडचांदुर शहरात न.प. अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते फॉरेस्ट ऑफिस ते शौचालयपर्यंत निकृष्ट दर्जाच्या सिमेंट काँक्रीट नालीच्या बांधकामाची संपूर्ण चौकशी करून दोषी कंत्राटदाराचे बिल नामंजूर करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी गडचांदूर न.प. चे मुख्याधिकारी, न.प. अध्यक्ष, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांचेकडे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नगर परिषद गडचांदूर अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते फॉरेस्ट ऑफिस ते शौचालय पर्यंत मागील अनेक महिन्यांपासून सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम सुरू असून अवधी समाप्त झालेला असून सुद्धा सदर बांधकाम अपुर्णावस्थेत आहे. नुकतेच कंत्राटदाराने नालीची सफाई होवू न देता व नालीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असतांना सुद्धा नालीवर झाकणे बसविण्याचा उपद्व्याप करून कामे पूर्ण झाल्याचा दिखावा केला व निकृष्ट दर्जाचे हे कार्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. यासंदर्भात गडचांदूर शहरातील प्रतिष्ठितांच्या व्हॉटस ग्रुप वर नालीवर कचरा असतांना झाकणे लावून ते बुजविण्याचे फोटो व या कामाच्या निकृष्ट दर्जाच्या तक्रारी व्हायरल झाल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे या नालीचे बांधकाम मंजूर झाल्यापासून या सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी वारंवार न.प. कडे करण्यात आलेल्या आहेत. परंतु कोणत्याही तक्रारी ची अद्याप शहानिशा न करता व कंत्राटदाराला समज न देता राजकीय व आर्थिक हित जोपासून या कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यात आले. सदर सिमेंट काँक्रीट नालीचे कार्य करणारा हा एका राजकीय पक्षाचा नातेवाईक असून बांधकाम क्षेत्राशी त्याचा कवडीमात्र ही संबंध नाही. राजकीय हित साधून त्याचेकडून होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कार्यावर न. प. प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असून नागरिकांच्या पैशाचा चुराडा केला जात आहे. तरी त्वरित सदर कामाची संपूर्ण चौकशी करून कंत्राटदाराचे उर्वरित बिल थांबविण्यात यावे व मुळ कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्यास वरिष्ठ स्तरापर्यंत सदर निकृष्ट सिमेंट काँक्रीट नालीच्या बांधकामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांकडे मागणी करण्यात येणार आहे असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.