Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

स्वकर्तृवातून राजकारणात अढळ स्थान निर्माण करणारा लढवय्या भूमिपुत्र : खासदार बाळू धानोरकर

राजकारणात यशस्वी होण्यासाठी राजकीय वारसा असावा लागतो असे अलिखित सूत्र आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाने आपले राजकारणात अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. माजी केंद्रीय मंत्री , माजी मुख्यमंत्री यांसह अनेक मात्तब्बर नेते पराभूत झाले. मात्र विपरीत परिस्थितीतही प्रवाहाविरोधात यशस्वी संघर्ष करत काँग्रेसचा राज्यात एक खासदार निवडून आला. त्यांचा विजयी रथ इथेच थांबला नाही. तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई या देखील भरघोस मत्ताधिक्य मिळवत आमदार झाल्या. आज यशाच्या शिखरावर असलेल्या बाळू धानोरकर यांचा प्रवास मागे वळून पाहताना आदर्शवत वाटतो. बऱ्याचदा यश हे नशिबाने मिळाले असे संबोधून यशस्वी होण्यासाठी केलेल्या परिश्रमाला नजरेआड केले जाते. नेतृत्व तयार व्हायला जीवनातील एक - दोन तपापासून सातत्याने कार्यरत राहताना प्रचंड यातना, संघर्ष, त्याग, लोकांच्या सेवेची असलेली भूक व हाती घेतलेले प्रत्येक काम झोकून देत पूर्ण करण्याची तळमळ या स्वभावगुणातून खा. बाळू धानोरकर यांचे नेतृत्व उदयास आले आहे. दरम्यानच्या काळात लोकहितासाठी केलेल्या अनेक आंदोलने व मोर्चे यांमुळे त्यांच्याविरोधात अनेक कोर्ट केसेस दाखल झाल्या. सामान्य जनतेच्या हितासाठी तुरुंगवास देखील भोगला. राजकरणातील प्रस्थापित कुटुंबांना शह देत सर्वसामान्य कार्यकर्ता ते खासदार हा संघर्षमय प्रवास करणारा लढवय्या नेत्याचा आज .... वा वाढदिवस त्यानिमित्त या भूमिपुत्राचा प्रवास समजून घेणे गरजेचे आहे.
                                 
       
राजकारणात मोठं होण्याकरिता नाव, पैसा, राजकीय वारसा असल्यानेच यशश्वी होऊ शकतो असा समाज बाळू भाऊने हाणून पाडला. मागील २ तपापासून भारतीय जनता पक्षाची चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पकड होती. याकाळात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत प्रस्थापित नेतृत्वांसमोर आव्हान उभे करणे सोपे नव्हते. व्यवस्थेतील अनितीविरोधात बंड पुकारताना अन्याय करणाऱ्यांची कोणतीही तमा त्यांनी बाळगली नाही. सामान्य जिल्हा परिषद शिक्षकाचा मुलगा. घरात कोणत्याच प्रकारचे राजकीय वारसा नाही. वैद्यकीय शिक्षणाची आवड त्यांच्यात होती. त्यांनी औषधी शिक्षण घेतले. कोणाचीही गुलामी न करता स्वकर्तृत्वाने वैभव निर्माण करण्याचा ध्यास असल्याने नोकरीच्या मागे न लागता त्यांनी कपड्याचे दुकान सुरू करून व्यवसायास प्रारंभ केला. अवतीभवती असलेल्या अन्यायाने त्यांना शांत बसू दिले नाही. कोणत्याही पदावर नसताना प्रशासनाला धारेवर धरून आक्रमकतेने लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची असलेल्या हातोटीने स्थानिक लोकांच्या मनात त्यांनी घर केले. समाजकारण करत असताना लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पुढे आमदार ते खासदार इथपर्यंतचा थक्क करणारा पल्ला बाळू धानोरकर यांनी गाठला. जिद्द, चिकाटी व अविरत परिश्रम यांमुळे खासदार बाळू धानोरकर खऱ्या अर्थाने युवकांचे प्रेरणास्रोत झाले आहे. 
                                                         बाळूभाऊंची राजकारणाची सुरवात मुळात भद्रावती या तालुक्याच्या गावापासून झाली. येथील छोट्या छोट्या जनसामान्यांच्या समस्या त्यांनी प्रशासनाचा समोर आणून त्या मार्गी लावण्याचे कार्य केले. विशेष म्हणजे मागील जिल्ह्यात सर्वात जास्त आंदोलन करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळंच ते पूर्व विदर्भातील शिवसेनेचे एकमेव आमदार होते. त्यासोबतच आता देखील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. खासदार बाळू भाऊ आता देखील सामान्य जनतेची नाळ पकडून असल्याचे दिसून येत आहे. आमदार असतांना त्यांनी वरोरा रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची उत्तम सोय होण्याकरिता त्यांच्या पुढाकारातून भोजन व्यवस्था सुरुर करण्यात आली, ती आजतागायक सुरु आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत देखील त्यांनी सामान्य जनतेची जेवणासाठी होत असलेली भटकंती बघत धान्य किट वाटप केले. त्यासोबतच प्रत्येक तालूक्यातील मोठ्या गावात शिवभोजन केंद्र व जेवणाचे डब्बे त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याची जनसामान्य जनतेत देखील मोठ्या प्रमाणात स्तुती करण्यात आली. मृत्यूच्या भीतीमुळे मोठं मोठे समाजसेवक व राजकारणी मंडळी घरी असताना दुसऱ्या लाटेत देखील त्यांनी स्वतः पीपीई किट घालून रुग्णाची स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपुलकीने विचारपूस केली. लोकांमध्ये मिसळण्याची वृत्ती व प्रेमळ स्वभाव राजकीय विरोधकांना देखील आपलासा करणारा आहे.
                                    समाजातील प्रत्येक घटकावर त्यांची बारीक नजर असते. समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याकरिता कसोशीने प्रयत्न करण्याची त्यांच्यात जिद्द आहे. तृतीयपंथी लोकांना समाजात हक्काचा निवारा असावा असा त्यांच्या प्रयत्न आहे. त्यासोबतच त्यांची कोणतीही अवेहेलना न होता सामान्य जनतेप्रमाणेच जीवन जगावे, त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता समाजातील सर्वच स्तरातून प्रयत्न व्हावे असा त्यांचा नेहमी आग्रह असतो. केवळ राजकारण नव्हे तर क्रिडा, साहित्य, उद्योग, कृषी आदी क्षेत्रात त्यांचा वावर असतो. "बोले तैसा चाले त्याची वंदावि पावले" या विचारप्रमाणे विचारांना कृतीची जोड देणारा नेता म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत. 

 राजकीय आंदोलन करताना गुन्हे दाखल झाले. प्रस्थापितांच्या मनात भिती निर्माण झाल्याने राजकीय विरोधकांनी सत्तेचा दुरुपयोग करत त्यांना दोनदा तडीपार केले. जेव्हा बाळू धानोरकर हे जिल्ह्यातून तडीपार होते तेव्हा मोठा मुलगा आठ महिन्याचा होता. मुलगा व पत्नी यांना सोबत घेऊन तिघेही महिनाभर बाहेर भटकत असताना ते कधी डगमगले नाही. 
                                           आजवरच्या यशामध्ये त्यांच्या अनेक गुणांपैकी ज्या एका गुणानी मला भारावून टाकले तो म्हणजे जर हेतू प्रामाणिक असेल तर होणाऱ्या परिणामांची काळजी न करता अविरत कार्यरत राहायचे. "लोक काय म्हणतील" हा विचार बाजूला सारत वेळप्रसंगी 'रिस्क' देखील घेण्याचे धैर्य त्यांच्या अंगी आहे. आमदारकीचे पद हाती असताना पक्ष व पद सोडून आपले सर्वस्व पणाला लावण्याचे जिगर या सामन्यातील असामान्य व्यक्तीने दाखविले. त्यावेळी अनेकांनी आता बाळू धानोरकर राजकारणातून संपेल, असे भाकीत देखील वर्तविले होते. परंतु निर्णय कसा योग्य होतो, हे त्यांनी निवडून येऊन दाखून दिले. त्यांचा विजयाला अनेक पदर आहेत. ते काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. 'रिस्क' घेण्याचे धाडस आणि स्वतःच्या मेहनतीवर असलेला आत्मविश्वास ही त्यांची जमेची बाजू ठरते. बाळू धानोरकर यांना खंबीर साथ देणारी अर्धांगिनी प्रतिभाताई यांचा बालवयापासून समाजकारणाकडे कल राहिला आहे. महिला व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना प्रकर्षाने जाणीव आहे. बाळूभाऊ यांनी आपली पत्नी केवळ चूल व मूल या चौकटीत न राहता तिच्यातील गुणांचा फायदा समाजाला झाला पाहिजे हा विचार मनाशी बाळगत पत्नीला देखील राजकारणात प्रवेश घ्यायला लावला. पुरुषांप्रमाणे महिलांनी देखील राजकीय सत्तेची केंद्र काबीज केली पाहिजे हा त्यांचा स्त्री पुरुष समतावादी विचार समाजाला दिशा देणारा आहे. विरोध झुगारून लावत नवख्या असलेल्या पत्नीला आमदार बनविले यातून खा. बाळू धानोरकर यांच्याबाबत जनतेच्या मनात असलेले प्रेम सिद्ध होते.

 रस्ते, पाणी, शिक्षण, वीज, आरोग्य व घरे या पायाभूत सुविधांसह सर्व समाजघटकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून सकारात्मक ऊर्जेने काम करत राहायला हवे. माणूस केवळ वयाने मोठा होत नाहीतर त्याच्या कामातून मोठेपण सिद्ध होते हा विचार खरा ठरवणारे बाळू धानोरकर यांच्या रूपाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात विस वर्षानंतर 'मराठी' माणूस खासदार म्हणून निवडून आला ही बाब अनेकांसाठी अभिमानास्पद आहे.

गोविल मेहरकुरे
9689988282

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies