चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरा पासून 18 किलोमीटर अंतरावर देवाडा गावातील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे.गावातील रहिवासी असलेल्या मल्लेश शेंडे यांच्या शेतात शेतीच्या मशागतीचे काम करण्यासाठी काही शेतमजूर गेले होते. शेतीचे काम संपवून राजू डामिलवार यांच्या मालकीचे ट्रॅक्टरवर बसून आपल्या घरी परत असताना अचानक आलेल्या पावसाने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला. या जोरदार प्रवाहाने ट्रॅक्टर, कल्टिव्हेटरसह नाल्यात वाहून गेला.
ट्रॅक्टर नाल्यात पडल्याने माधुरी विनोद वगणे (वय 27), मलेश शेंडे (वय 45), आणि लक्ष्मी विनोद वगणे (वय 7) यांचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर मालक राजू डामिलवार, बाधू कुमरे आणि बालवीर कोवे सुखरूप बचावले. गावातील नागरिकांनी शोधमोहीम राबवून माधुरी विनोद वंगणे आणि लक्ष्मी विनोद वंगणे यांचा मृतदेह शोधले तर मलेश शेंडे यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे देवाडा गाव सुन्न झाले असून एकाच घरचे मायलेकी मरण पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी राजुरा पोलीस पोहचले असून अधिक तपास सुरु आहे.