कोरपना:- आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दोन बाईक समोरा समोर धडकल्याने तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे.सदर घटना २३ जून बुधवार रोजी दुपारी अंदाजे ३ च्या सुमारास पारडी येथील शिव मंदिरा जवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार सुपर स्प्लेंडर बाईक क्रं.एमएच ३४ एन ५१३५ ही कोरपनाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या यामाहा बाईकला धडकली.यात स्प्लेंडर वरील सोयाम (३७), विश्वास(४०) रा.येलापुर व यामाहा बाईकवरील राजू (३४) रा.इदरवेल्ली हे जागीच ठार झाले.तर मुस्तकीम (१८)रा. इदरवेल्ली हा गंभीररित्या जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेहांना ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले.घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरूण गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.