Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे. लोकांचे काय ते तर देवालापण गरजेपुरतं पुजतात

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच. सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा, हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भणाणू लागते, तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात.

खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि तुम्हाला कमी लेखण्याची संधी शोधू लागतात. मग तुमच्यावर आरोप होतात. गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे, गैरजिम्मेदारीचे असे लोक आपल्याला अप्रत्यक्ष विरोध करत असतात, तुमच्यातला चांगुलपणा झाकून, तुम्ही किती वाईट आहात हे दाखविण्यासाठी तुमच्यातल्या उणिवा ओरडून सांगत, छुप्या चर्चा सुरु होतात.

सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाहीत, पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. खरे नुकसान हे या क्षणाला होते. अशावेळी शांत राहणे ही समंजसपणाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हलव्या कोपऱ्यात जपायचे असतात.

यश पचविणे एक वेळ सोपे, पण आरोप रिचवणे खूप कठीण. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत रहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मीकशक्तीचा तो साक्षात्कार आहे. तुमच्या शांत राहण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.

द्वेष भावनेने तुमच्यावर आरोप करणाऱ्यांचे तुमच्याविरुद्ध कट-कारस्थान रचनारांचे कालांतराने पितळ उघडे पडतेच आणि सत्य काय ते समाजाला समजते. त्यांना प्रत्युत्तर न देता, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने तुमचा वेळ आपल्या कार्यात लावल्याने तुम्ही बरीच प्रगती केलेली असते, तर जे तुमच्या सतत प्रगतिशील वाटचालीस पहात त्यांच्या कुटिलवृत्तीमुळे पारावरच हात चोळत, जैसे थे स्थितित रसातळाला जात असतात व काळ त्यांना योग्य ती शिक्षा देत असतो.
शेवटी काय तर “आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही, पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात” माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे. लोकांचे काय ते तर देवालापण गरजेपुरतं पुजतात.

जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही. तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही, कधीकधी एकटे पण लढावे लागते. पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies