Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सत्ताप्राप्तीसाठी "असत्याचे प्रयोग""कोरोनामुळे राजकारण आणि राजकारणी सुस्तावले होते. राजकीय नेते कोरोनाच्या भीतीने आपापल्या घरात दडून बसले होते. कोरोनाच्या दोन लसी घेतल्यामुळे म्हणा की दारूबंदी उठविल्याच्या अतिउत्साहामुळे आता हे नेते नव्या ताकदीने राजकारण करू लागले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून शहर आणि जिल्हा हळूहळू सावरत असताना मनपाच्या राजकारणाला आता वेग येऊ लागला आहे. पुढील वर्षी चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक होईल. वर्षभराचा अवकाश असलातरी सत्ता काबीज करण्यासाठी स्थायिक कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत. त्यासाठी सत्ताधारी भाजप खुर्ची कायम ठेवण्यासाठी खटाटोप करीत आहे. तर दुसरीकडे सत्ता उलथवून लावण्यासाठी विरोधी पक्ष "असत्याचे प्रयोग" करीत आहे. आता तुम्ही म्हणाल, हे "असत्याचे प्रयोग" काय आहे. आता थोडंसं इतिहासात जाऊ. "माझे सत्याचे प्रयोग" ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे. गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे. गांधींचा वारसा घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वाटचाल करीत आहे. परंतु, याच गांधीजींचा वारसा विस्मरणात गेलेला आहे. राजकीय स्वार्थापोटी कळीचा नारद केला जात आहे.

एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीत भाजपने ३६ जागा जिंकून मुसंडी मारली. स्पष्ट बहुमत घेऊन भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. महापौरपदी अंजली घोटेकर विराजमान झाल्या. त्यांनी अडीच वर्षे पूर्ण केल्यांनतर राखी कंचर्लावार यांनी पदभार स्वीकारला. मागील ४ वर्षांपासून जनतेने भाजपच्या हाती सत्ता सोपविली. जनहिताच्या कामे झाली. अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोरोनाच्या काळात माणुसकी दाखविली. सामाजिक बांधिलकी जोपासली. कोरोना अद्याप संपला नाही. भविष्यांत येणाऱ्या लाटेला थोपवून धरण्यासाठी भाजप सत्ताधारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. जनतेचा कौल भाजपच्या बाजूने आहे. हीच स्थिती कायम राहिली तरी पुन्हा पाच वर्षे सत्तेची चाबी हाती येणार नाही, याची भीती विरोधी पक्षाला वाटू लागली आहे. म्हणूनच पत्रकबाजी करून काही पत्रकारांना हाताशी धरून आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार सुरु झाला आहे. मुळात माझ्यापेक्षा दुसरा कोणी शहाणा नाही; हुशारीचा आणि शहाणपणाचा सर्व ठेका मलाच मिळाला, असा बाळबोध समज काहींना झाला आहे. पण, यांच्या गळ्यात शहाणपणाची घंटा बांधणार कोण? एकवेळ मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे सोपे आहे, पण यांच्या गळ्यात प्रगल्भतेची, संयमाची, विचारीपणाची घंटा बांधणे कठीणच आहे. निवडणुकीला वर्ष शिल्लक असताना "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग" अशी गत शहर नेत्याची झाली आहे. कधी निवडणूक होते आणि कधी महापौर बनतो, याच स्वप्नांत दिवसाची रात्र केली जात आहे. पण, ते अळवावरचे पाणीच ठरेल यात शंका नाही.

महापालिकेत २०० कोटींचा गैरव्यवहार झालाच नाही, तरीही घोटाळा झालाच असाच कांगावा करण्यात आला. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" या उक्तीप्रमाणे ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसते. म्हणजेच भ्रष्ट्चारी लोकांना कुणी चांगलं केलं तरी घोटाळाच दिसतो. न झालेल्या घोटाळ्याची शासनामार्फत चौकशी होणार म्हणे. एखादी शुक्कल गोष्ट घडली तरी ती फुगवून सांगितली जात आहे. आता हेच बघा ना, काल परवाचीच गोष्ट. काँग्रेसच्याच कार्यकत्यांनी आपण भाजपचे नगरसेवक असल्याची बतावणी करून चक्क काँग्रेसच्याच प्रदेशाध्यक्षाची दिशाभूल केली. त्यांनीही भूलभुलय्यावर विश्वास ठेवून चौकशी करतो, असे सांगितले. लेखा परीक्षण अहवालातील त्रुटी म्हणजे घोटाळा नव्हे, हे साधे न कळावे, हे कसले राजकीय मुरब्बी. मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असताना तिचा विपर्यास करून सांगताना "राईचा पर्वत केला" जात आहे. स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा लागत नाही आणि हे सत्य जनता जाणून आहे. पण, स्वार्थी राजकारणासाठी सर्वस्व पणाला लाऊन "असत्याचे प्रयोग" सादर केले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies