Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून योग्य नियोजन करा : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने



पोर्टल वरील माहिती अद्यावत करण्याच्या दिल्या सूचना


हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करा


चंद्रपूर, दि.13 मे : जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाकडून अद्याप तिसऱ्या लाटेबद्दल सूचना आली नसली तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन तयारीत रहावे .
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा उभ्या केल्या असून उपलब्ध बेड,औषधांचा पुरवठा, मनुष्यबळ, नागरिकांची आरोग्य तपासणी, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असून त्याचे योग्य नियोजन आत्तापासूनच करून ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मुख्याधिकारी विजय सरनाईक तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की,फॅसिलिटी अॅप पोर्टलमध्ये कोविड केअर सेंटर,डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, इत्यादीची उपलब्ध माहिती पोर्टलवर अपडेट करून घ्यावी तसेच नव्याने ज्या फॅसिलिटी अपडेट करावयाच्या आहेत. त्या तातडीने करून घ्याव्यात
तसेच पोर्टलवर एंट्रीमध्ये रुग्णाचे नाव, पत्ता,मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक बाबींची माहिती अद्ययावत करावी, अशा सूचना दिल्या.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद :


यावेळी तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोविड विषयक आढावा घेतला.

ज्या तालुक्यात खाजगी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहेत त्यासाठी ऑडिटरची टीम नेमण्यात आली असून रुग्णांकडून आकारण्यात आलेल्या अतिरिक्त बिलांच्या रकमेची तपासणी करण्यात येत आहे.
तसेच कोणतीही परवानगी नसतानां मान्यता नसलेले काही डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करतात व त्यांची आर्थिक लूट केल्या जाते असे होता कामा नये.

जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, तसेच येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेला गृहीत धरून
हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व काही अतिरिक्त फॅसिलिटी वाढविण्याच्या दृष्टीने उपलब्ध जागा पाहून ठेवाव्यात.व सदर प्रस्ताव तातडीने सादर करावेत असे ते म्हणाले.

जिल्ह्यात नो मास्क, नो एन्ट्री ही मोहीम राबविण्यात आली होती ती यशस्वी झाली असून पुनश्च: ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, ग्रामीण भागात नागरिकांना कोविड सदृश्य लक्षण आहेत. त्यामुळे नागरिकांनी सामोरे येऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी. आरोग्य विभागाने आयएलआय व सारीचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन पूर्ण करून घ्यावे. सदर सर्वेक्षणात व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आल्यास कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करून घ्यावे.

20 मे रोजी पंतप्रधान जिल्ह्याच्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे सादरीकरण करीत असतांना डिस्चार्ज झालेले रुग्ण, दैनंदिन बाधित रुग्ण, मृत्यू, ॲक्टिव्ह रूग्ण, आरटीपिसीआर तसेच अॅटिंजेन तपासणी, आयएलआय व सारी रुग्णांची दैनंदिन माहिती अद्यावत ठेवावी असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी लसीकरणासंदर्भातही आढावा घेतला. कोरोनावर लसीकरण हा उपचार असून शहरी व ग्रामीण भागातील लसीकरण योग्य पद्धतीने व्हावे. लसीप्राप्त झाल्यानंतर जिल्हा अंतर्गत योग्य वितरण व्हावे. तसेच ज्या भागांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद नाही त्या भागात लोकप्रबोधन व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी सर्व तालुक्यातील सद्यस्थिती जाणून घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies