शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकारपरिषद घेत इयत्ता दहावी मूल्यमापन प्रक्रीया व इयत्ता अकरावी प्रवेशाबाबत सवस्तिर माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन होणार, असल्याचेही सांगितले आहे.वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यातील करोना संसर्गामुळे मागील वर्षभरापासून आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत. शिक्षण क्षेत्रातही खूप मोठ्याप्रमाणावर आव्हानं आलेली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन अध्यापन यासाठी आपण वर्षभर विविध उपक्रम राबवले आहेत. करोना प्रादुर्भावामुळे मार्च-२०२१ पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट असलेले विद्यार्थी, पालक व परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही आमची सगळ्यात महत्वाची प्राथमिका आहे, हे आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहोत. म्हणूनच राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित केलेली इय़त्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील निर्णय आम्ही, राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी वर्षासाठी प्रविष्ट असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे, सरकट उत्तीर्ण करण्यास संदर्भातील परवानगी दिली होती.
करोनामुळे उद्भवलेल्या असमान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना मी सांगू इच्छिते की, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आली. या सर्वांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण आम्ही निश्चित केले आहे.सदर मूल्यमापन धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन करण्यात येईल. यामध्ये इयत्ता नववी व इयत्ता दहावी, सुधारित मुल्यमापन धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांवर आधारित असेल.