चंद्रपूर :- राजकीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारून मैत्रीचा धागा घट्टपणे जोपासणारा मित्र गमावल्याचे दुःख झाल्याची भावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.
विधानसभेच्या माध्यमातून झालेली आमची मैत्री झाली . ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मैत्रीचा धागा तसाच घट्ट ठेवला. आम्हा दोघांचे पक्ष भारतीय राजकारणातले भिन्न विचारसरणीचे पक्ष असले तरी मैत्रीत त्यामुळे कधीही अंतर पडले नाही . त्यांच्या निधनाने एक सात्विक , सोज्वळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणाची व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे , असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
राजकारणातील देव माणूस गमावला : ना. विजय वडेट्टीवार
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला , आम्हा सर्व कॉंग्रेसजनांना प्रचंड मोठा असा धक्का बसला असून अत्यंत प्रामाणिक, पक्षश्रेष्ठींनी दिलेले काम चोखपणे बजावणारे, पक्षश्रेष्ठीचे अत्यंत जवळचे विश्वास पात्र नेते, चुकलेल्यांवरही न रागावता समजावून सांगणारे मितभाषी असलेला राष्ट्रीय नेता अशी स्वताची स्वतंत्र ओळख असलेला राजकारणातील देव माणूस आपल्यातून हरपला आहे , अश्या शब्दात राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या . गेली 23 दिवस ते हॉस्पिटलमध्ये असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर राहून ते त्यातून सावरून बरे होत होते. त्यामुळे आम्हाला आशा वाटत होती की , ते या आजारातून पूर्णपणे बरे होतील असे वाटत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या एन तरुण वयात जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही . गुजरात सारख्या राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी पार पडलेली जबाबदारी , हीच त्यांच्या कार्याची पावती आहे . बहुजनांचा नेता म्हणून नेतृत्व करीत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावून भविष्यातील राष्ट्रीय राजकारणातील नेता म्हणून भिस्त होती, असा नेता आज आम्ही गमावला आहे . कुठलेही राजकीय पाठबळ नसताना काँग्रेस पक्षाच्या राष्टीय राजकारणात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली . २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मी स्वतः त्याचेंबरोबर लोकसभा निवडणूक प्रचारसभेत सोबत होतो, मोदी लाटेत त्यांनी निवडणूक जिंकली. केवळ एक प्रामाणिक माणूस, समर्पित नेतृत्व व सच्चा बहुजनांचा नेता म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले . महाराष्ट्रातून त्यावेळी दोनच खासदार निवडून आले होते त्यात एक राजीव सातव होते . भविष्यातील महाराष्ट्र राज्याचे कर्णधार म्हणून आम्ही त्यांचेकडे बघत होतो . त्यांच्याबाबतीत आठवणी खूप आहेत. त्यांचा शब्दांचा मला खूप मोठा आधार होता तो आधारच आज हरपल्याने मोठे दुःख झाले आहे , अश्या शब्दात ना. विजय वडेट्टीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्यात .
अभ्यासू युवा नेतृत्व, महाराष्ट्राचे एक कर्मठ खासदार, जवळीक मित्र राजीव सातव यांच्या रूपाने गमावला - हंसराज अहीर
लोकसभेत अभ्यासपूर्ण संवादातून आपली छाप सोडणारे सोळाव्या लोकसभेत सोबत काम करणारे राजीव सातव यांच्या निधन झाल्याचे कळताच फार दुःख वाटले. हिंगोली मतदारसंघाचे खासदार असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील एक मतदार संघ जुडलेला असल्याने यवतमाळ जिल्हा बैठकीत नेहमी भेटी होत असत. १६ व्या लोकसभेल सहकारी होते. त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण, प्रश्न असायचे. कर्मठ वृत्ती, काँग्रेसनिष्ठ, महाराष्ट्राचा युवा नेता उमेदीच्या काळात गमावला असल्याची भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली.