Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचा डॉक्टर नियुक्तीला हातभारकोविड काळात नागपूरातील पाच तज्ञ डॉक्टर चंद्रपूरकरांच्या सेवेत.

चंद्रपूर, दि. 14 मे : कोविड-19 च्या वैश्विक महामारीचा सामना संपूर्ण भारत देश करत असून महाराष्ट्रात सुध्दा दिवसेंदिवस या महारामारीचा प्रादुर्भाव नागरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना अहोरात्र आरोग्य सेवा देत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांचा दररोजचा चढता आलेख पाहता आरोग्य व्यवस्थेला प्रचंड ताण सहन करावा
लागत आहे. तसेच जिल्ह्यात रुग्णांसाठी आरोग्य विभागातील अपु-या मनुष्यबळामुळे रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यास अडथळा निर्माण होत असून यामध्ये रुग्णांची होरपळ होवून रुग्ण दगावण्याचे प्रमाणसुध्दा दिवसेंदिवस वाढत आहे.

आजमितीस चंद्रपूर जिल्ह्यात कोविड-19 च्या रुग्णांकरिता खाटा उपलब्ध आहे. परंतु त्यांचेवर उपचार करण्याकरिता एमबीबीएस एमडी अशा तज्ञ डॉक्टरांची वाणवा आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत डॉक्टरांना मासिक 60 हजार इतके मानधन दिल्या जाते.पण सद्यस्थितीत इतर मोठ्या शहरात कोविड रुग्णांना तज्ञ डॉक्टारांची सेवा उपलब्ध होण्याचे उद्देशाने दरमहा एक लाख मानधन देण्यात येते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कमी मानधनावर काम करण्यास तज्ञ डॉक्टर शासकीय रुग्णालयात सेवा देण्यास असहमती दर्शवित आहेत.

महामारीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची सेवा करण्यास तत्परतेने कामे करित आहेत.परंतु अशातच सदर अधिकारी व कर्मचारी यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्यास अपु-या आरोग्य सेवेमुळे त्याच्यावर प्राधान्याने उपचार करता येत नसल्यामुळे त्यांना प्राणास मुकावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांना जर कोविड-19 चा संसर्ग झाल्यास त्यांचेवर तज्ञ डॉक्टरांकडून प्राधान्याने उपचार करण्याबाबत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले यांचेकडे वारंवार मागणी करण्यात येत होती.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी कोविड-19 च्या संसर्गाने बाधीत झाल्यास त्यांचेवर उपचार करण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत
दरमहा 60 हजार व जिल्हा परिषद कर्मचारी यांनी आपले माहे एप्रिल 2021 चे वेतनातून एक दिवसाचे वेतन संकलीत करून स्थापीत केलेल्या "जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी कल्याण निधीतून 40 हजार असे एकूण 1 लाख मासिक मानधनावर नागपूर येथील पाच तज्ञ एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

याबाबत सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद
कर्मचारी आणि शिक्षकांनी केलेल्या सहकार्यामुळेच राष्ट्रीय आरोग्य अभियांनाअंतर्गत डॉक्टरांना देण्यात येणारे मानधन मर्यादेपेक्षा वाढीव मानधन देणे शक्य झालेले आहे.

याबाबत सा.प्र.विचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत,
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिंगलदिप कुमरे, राज्याध्यक्ष शालिक माऊलिकर, नितिन फुलझेले,
आनंद सातपुते, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आभार व्यक्त केलेले आहे.

कोविड-19 महामारीत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक भावनेतून एक दिवसाचे वेतन संकलीत केल्यामुळेच त्यांच्याकरिता आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता आल्या. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनावरील ताण हलका करून एक चांगला पायंडा घातल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले
यांनी सर्व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

तर अधिकारी व कर्मचारी यांची मागणी मान्य करून आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिंगलदीप कुमरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies