Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

"म्युकरमायकोसिस"चे लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला



वेळीच उपचार घेतल्यास "म्युकरमायकोसिस"
आजाराचा धोका टाळता येऊ शकतो

चंद्रपूर, ता. २४ : "म्युकरमायकोसिस" हा आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवणारा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. तो अतिशय वेगाने पसरतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

"म्युकरमायकोसिस" हा एक अतिजलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो. कोरोना आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांना "म्युकरमायकोसिसचा" धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, तसेच ज्या रुग्णांना मधुमेह आहे, अशा रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. मात्र वेळीच उपचार घेतल्यास "म्युकरमायकोसिस" या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.

हा विषाणू साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर "म्युकरमायकोसिस" हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींनी सहा आठवड्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

लक्षणे
१. चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे
२. अर्धशिशी (डोक्याची एक बाजू दुखणे)
३. नाक चोंदणे, नाकावर सूज येणे
४. एका नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव
५. चेहरा अथवा डोळ्यावर सूज
६. एक पापणी अर्धी बंद राहणे, डोळा दूखणे
७. वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे
८. अस्पष्ट दिसणे
९. ताप

हे करावे - प्रतिबंधात्मक उपाय
१. रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे
२. कान, नाक, घसा, नेत्र व दंतरोग तज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी करावी
३. वरील लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टराशी संपर्क साधावा
४. डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉइड घेऊ नये
५. टूथब्रश/मास्क वरचेवर बदलणे
६. दिवसातून एकदा गुळण्या करणे
७. वैयक्तिक व परीसरातील स्वच्छता ठेवणे
८. जमिनीखाली लागणाऱ्या भाज्या नीट स्वच्छ धुवून खाव्यात
९. मातीत काम करताना व खतांचा वापर करतांना पूर्ण बाहीचा शर्ट, फुलपॅट, हातात ग्लोव्हज घालावे व नाका तोंडावर मास्क घालावा
१०. वैद्यकीय सल्ल्यानेच स्टिरॉइड व इतर औषधांचे सेवन करावे

हे करु नये
१. छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये
२. घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये


या आजाराबद्दल जागरूक राहणे व काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रोग बळावल्यास दृष्टी आणि जिवाला धोका पोहचू शकतो. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करण्याचे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies