स्वतंत्र कक्ष असला तरी कक्षात उपचारासाठी कुठलीही सुविधा नाही
चंद्रपूर :- कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना आता म्युकरमायकोसिस हा गंभीर आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजारामुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली असून या आजाराच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याच्या वारंवार सूचना देऊ नही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाळे हे दुर्लक्ष करीत आहेत. दरम्यान या आजाराची चंद्रपुरात आज पर्यंत 48 रुग्ण सापडले आहे. रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असला तरी या कक्षात उपचारासाठी कुठलीही सुविधा नसल्याने रुग्णांना नागपूरचा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविले जात असल्याची बाब आता उघडकीस आली आहे.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
हा दुर्मिळ आजार असला तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांना ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसचा धोका असतो. कोविड १९ मुळे त्याची लागण होत असल्याची बाब नवी व धोकादायक आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचे कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायनस याच्यावर दुष्परिणाम करतो. याची लागण एकापासून दुसऱ्याला होत नाही.
कोविड १९ आणि म्युकरमायकोसिस
मधुमेह, फार जास्त दिवस रुग्णालयामध्ये ॲडमिट राहणारे, रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारी औषधी यामध्ये कोविड -१९ चा उपचार घेत असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी स्टेराईड आणि काही औषधे देण्यात येतात. यामुळे त्याच्या प्रतिकारशक्तीवर बिकट परिणाम होतो. यामध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
म्युकोर मॉयकॉसिसची लक्षणे -
चेहऱ्यावर सूज येणे, दात दुखणे, दात हलणे, हिरडयातून पस येणे, जबडयाचे हाड उघडे पडणे, तोंडातून घाणेरडा वास येणे, नाकातून रक्त येणे, डोळ्यांवर सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे, नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.
उपचार काय -
तातडीने निदान करून बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती अवलंब करणे आवश्यक आहे. संसर्ग शरीराच्या इतर भागात जसे जबडा, डोळे, सायनसपर्यंत पोचला, तर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते. उपचार किंवा निदान करण्यात विलंब लावल्यास दृष्टी जाऊ शकते. जबडयाचा भाग काढावा लागू शकतो. पंधरा दिवसांत हा संसर्ग 'सर्वदूरपर्यंत पोहोचल्यास रुग्णांच्या मृत्यूची शक्यता ८० टक्के असते. त्यामुळे कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांनी एकदा आरोग्य तपासणी न चुकता करून घ्यावी, असे आवाहन नोडल अधिकारी म्युकोर मॉयकॉसिस तथा दंतशल्यचिकित्स डॉ. आकाश कासटवार यांनी केले.