राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळणं कठीण झाले आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण वाढला आहे.चंद्रपूर या परिस्थितीला अपवाद नाही. येथेही बाधित आणि मृत्यूचा उच्चांकी आकडा दरदिवशी पुढे येतो आहे. आठवडाभरात चार जणांना बेड न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गुरुवारी परत ऑक्सिजन बेड न मिळाल्याने एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला.
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी वृद्ध बापू कपकर हे कोरोना बाधित झाल्यामुळे आणि प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला आज गुरुवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्या वृध्दासोबत त्याची म्हातारी पत्नी सोबत होती. त्या वृद्धाचे दुर्दैव असे की त्यांना तब्बल पाच तास उपचारासाठी बेड मिळाला नाही. त्यामुळे तो वृध्द जिल्हा रूग्णालयातील एका झाडाखाली उपचारासाठी पत्नीसह ताटकळत होता. परंतु ना बेड मिळाला ना उपचार. अखेर त्या वृद्धाने आपल्या म्हाताऱ्या पत्नीच्या कुशीत शेवटचा श्वास घेतला. आठवडाभरात जिल्ह्यात ऑक्सिजन बेड अभावी मृत्यू होण्याची ही पाचवी घटना आहे. अशा प्रकारे दुर्देवी मृत्यू होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असूनही असे होणारे मृत्यू रोखण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे.