एका रुग्णाला रुग्णालयाच्या दारात गाडीतच त्याचा मृत्यू झाला. हृदयद्रावक बाबा म्हणजे, सलग 3 दिवसात 4 कोरोना रुग्णांचा उपचाराविना तडफडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती किती भयावह झाली आहे याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मनोहर डांगे असं या 50 वर्षीय मृताचे नाव आहे. चिमूर येथील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. या रुग्णाचे नातेवाईक त्याला सोबत घेऊन शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दिवसभर बेडसाठी फिरले. मात्र त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. अखेर हतबल होऊन त्यांनी शासकीय कोविड रुग्णालयाबाहेर बेड मिळण्याच्या प्रतिक्षेत गाडी लावली. पण वेळेवर उपचार मिळू न शकल्यामुळे रुग्णाचा गाडीतच मृत्यू झाला.
मनोहर डांगे यांच्या मृत्यूसाठी बेड न मिळण्याचं कारण जेवढं जवाबदार आहे, तेवढेच त्यांच्या RTPCR चाचणीचा अहवाल येण्यास झालेला उशीर देखील जबाबदार आहे, असा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. त्यांची अॅन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली होती, मात्र RTPCR अहवाल येण्यासाठी 3 दिवस लागले आणि यादरम्यान त्यांची तब्येत खालावली. अखेर उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे कालच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली आणि तातडीने आरोग्य यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले होते. मात्र या आढावा बैठकीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली हतबलताही बोलून दाखवली.