कोरोनाच्या अशा या जीवघेण्या काळात स्वत:ची आणि कुटुंबियांची जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेणे गरजेचे आहे. नवीन स्ट्रेनमध्ये अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून आली आहेत. या दरम्यान साधा ताप, खोकला, सर्दी आणि कोरोनाचा ताप, सर्दी, खोकला हे वेळीच ओळखता येणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळीच धोका ओळखून उपचार करता येतील.कोरोनाचा खोकला कसा असतो हे जाणून घेऊया…
कोरडा खोकला
कोरडा खोकला हे कोरोना विषाणूची लागण झाल्याचे एक लक्षण आहे. एका अहवालानुसार 59 ते 82 टक्के कोरोना रुग्णांना सुरुवातीच्या काळात कोरडा खोकला दिसून आला. तर जागतिक आरोग्य संघटना आणि चीनने फेब्रुवारी 2020 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार 68 टक्के लोकांमध्ये कोरडा खोकला हे लक्षण दिसून आले.
कसा असतो हा कोरडा खोकला?
कोरड्या खोकल्याचा अर्थ खोकताना रुग्णाच्या घशात आणि तोंडात कफ किंवा थुंकी न येणे. खोकताना जर तुमच्या घशातून कफ येत असेल तर त्याला कोरडा खोकला म्हणता येणार नाही. कोरड्या खोकल्यासोबत थंडी वाजून येणे आणि ताप येणे ही देखील लक्षणे रुग्णात दिसतात. मात्र कोरडा खोकला हे एखाद्या अॅलर्जीचेही लक्षण असू शकते, त्यामुळे लगेचच घाबरून जावू नका.
सततचा खोकला
तुम्हाला जर सतत खोकला येत असेल तर हे देखील कोरोनाचे लक्षण आहे. खोकताना घशातून एकसारखा आवाज येत असेल आणि तुमचा आवाज बसला असेल तर डॉक्टरांकडे नक्की जावून तपासणी करा.
श्वास घेण्यास त्रास
कोरडा खोकला आणि तापासह श्वास घेण्यास भास होणे हे विषाणूचे लागण झाल्याचे संकेत आहेत. सतत खोकल्याने आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टवर दबाव पडतो आणि यामुळे रुग्णाला धाप लागते. एका अहवालानुसार जवळपास 40 टक्के रुग्णांमध्ये श्वास घेण्याचा त्रास होत असल्याचे लक्षण दिसले आहे.
घशात खवखव होणे
घशात खवखव होणे यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र कोरोना विषाणू नाकावाटे घशात उतरल्याने घशाला सूज आणि घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. कोरडा खोकला, ताप, थकवा यासह घशात खवखव होत असेल तर तुम्हाला विषाणूची लागण झाल्याची शक्यता असू शकते.
गंध न समजणे
सर्दी आणि ताप आल्यानंतरही अनेकांना गंध समजत नाही. मात्र ताप, खोकला, सर्दी असेल आणि तुम्हाला गंध येत नसेल तर हे एक कोरोनाचे लक्षण आहे. एका अहवालानुसार 41 टक्के संक्रमितांमध्ये हे लक्षण दिसले आहे.