Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

22 लाखांची अवैध दारू पकडणाऱ्या पोलीस शिपाई रामटेके यांना शाब्बासकी ऐवजी वरिष्ठांकडून शिव्यांचा वर्षावपोलीस विभागात नेमके चालले तरी काय?

पोलीस अवैध दारू तस्करांचे पाठीराखे तर नाही?

वरोरा :-
: गुप्त सूचनेच्या आधारावर वरोरा येथील पोलीस शिपाई यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअॅप मधून २२ लाखाची दारु पकडून दिली व कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत: फिर्यादी बनून अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणात प्रामाणिक पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांना पोलीस विभागातर्फे शाबासकीची थाप देण्याची आवश्यकता असताना मात्र वरिष्ठांकडून दारू का पकडली? म्हणून त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करून त्याला दुय्यम वागणूक दिल्या गेली असल्याचे कळते. जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या प्रामाणिक पोलिस शिपाई रामटेके यांना वरोरा पोलीस स्टेशन तर्फे मदतीचा हात न मिळाल्याने पोलिस विभागात नेमके चालले तरी काय? यावर शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
अधिक माहितीनुसार प्रवीण चंदू रामटेके मागील १३ वर्षापासून पोलीस विभागात कार्यरत असून वरोरा येथे मागील दोन वर्षापासून आपले कर्तव्य बजावीत आहेत. रोखठोक वृत्ती व प्रामाणिकपणामुळे जनमानसात त्यांनी आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी आपली ड्युटी आटपून रात्री आपल्या घरी विश्राम करत असताना रात्री तीन वाजताच्या सुमारास त्यांना एक मुखबिराचा फोन आला की वरोरा शहरातून मोठ्या प्रमाणात दारू चंद्रपूर कडे जात आहे. सूचना मिळताच ते आपल्या दोन पंचांना घेऊन नागपूर – चंद्रपूर हायवेवरील आनंदवन चौकात पोहोचले. सूचनेप्रमाणे विना नंबर प्लेट वाली पिकअॅप त्यांना येताना दिसली. त्यांनी संबंधित वाहनचालकाला थांबण्याचा इशारा केला परंतु संबंधित गाडी चालकाने गाडी न थांबविता सुसाट वेगाने तिथून पळ काढला. पोलीस शिपाई रामटेके यांनी आपल्या चारचाकी गाडीने त्या अवैध दारूवाल्या गाडीचा पाठलाग केला असता अशोक लेलन्ड कपनीचे पिकअॅप वाहनचालक बोर्डा चौक परिसरात गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. पोलीस शिपाई रामटेके यांनी गाडीची पाहणी केली असता ताडपत्रीने झाकून असलेल्या विना नंबर प्लेटच्या गाडीत विदेशी दारू खरड्याच्या खोक्याने ठसाठस भरलेली दिसली.
विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारास या दारूच्या गाडीला सुखरूप त्याच्या मालकाकडे पोहोचण्यासाठी चंद्रपूर पोलीस विभागाच्या कर्मचार्‍यांकडून पायलेटिंग करण्यात येत असल्याचेही कळते. कारण अवैध दारुची गाडी पकडताच लगेच चंद्रपूर पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेशी संबंधित एक- दोन कर्मचाऱ्यांनी तसेच एका ‘बंड्या ‘ नावाच्या मोठ्या दारू तस्करांनी गाडी सोडण्यासाठी पोलीस शिपाई रामटेके यांच्याशी संपर्क साधला व गाडी सोडण्यासाठी विनंती वजा दम ही दिला असल्याचे कळते. अशा वेळी पोलीस शिपाई रामटेके यांनी हिम्मत सोडली नाही व ते कोणत्याही आमिषाला बळी सुद्धा पडले नाही. त्यामुळे पोलीस शिपायांसारख्या छोट्या कर्मचाऱ्याला गप्प बसविण्यासाठी संबंधितांद्वारे वरोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचे मार्फत फोन लावून गाडी सोडून देण्याची आदेश देण्यात आल्याचे कळते. परंतु प्रवीण रामटेके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीच्या आदेशाला न जुमानता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत थेट गाडी पोलीस स्टेशनला लावली व स्वतः फिर्यादी म्हणून रिपोर्ट दिली.
गाडी पोलीस स्टेशनला लागल्यानंतर व पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलीस शिपाई रामटेक याच्यावर शिव्यांचा भडिमार करण्यात आला. अवैध दारूची ऐवढी मोठी कारवाई एकट्याने एक हाती पार पाडून सुद्धा त्यांच्या मदतीला अपवाद वगळता कोणीच पोलीस कर्मचारी नव्हते. शेवटी रामटेके व त्यांच्या दोन पंचांनीच गाडीतून दारूचे खोके खाली उतरून मोजणी केली व नंतर तसेच गाडीत भरले. पिक अप गाडीत स्टर्लिंग रिझर्व्ह बी – ७ कंपनीचे बॅच नंबर २६० दि २७/३ /२१ एकूण किंमत १ लाख ३६ हजार ४०० तसेच गो- गो प्रीमियम कंपनी बॅच नंबर ४0 दि ०३ / २१ एकूण किंमत ५ लाख ८३ हजार २००, रियल स्टार प्रिमियम कंपनी बॅच नंबर १६ दि. ०३ / २० एकूण किंमत २ लाख३० हजार ४००, रियल प्रिमियम कंपनी बॅच नंबर ३७ दि.०३/२१ एकूण किंमत ८ लाख ९२ हजार ८०० असा एकूण १८ लाख ४३ हजार २०० रु.चा मालाचा समावेश होता. विदेशी दारू करीता वापरलेली अशोक लेलन्ड कंपनीची पिक अप गाडी किंमत ४ लाख रुपये ताब्यात घेतली. एकूण विदेशी दारू व गाडी २२लाख ४३ हजार २०० रू.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. व अज्ञात आरोपी विरूद्ध अपराध क्र.३३७/२०२१ कलम ६५ (अ ) ८३ म.दा.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त सूचना मिळाल्यानंतर आपले काम प्रामाणिकपणे पार पाडून पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणाऱ्या पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांना मात्र रात्री तीन वाजता पासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत उपाशीपोटी राहावे लागले. त्यांची साधी दखलही घ्यायला कोणी तयार नव्हते,असे पोलीस स्टेशनचे एकूण चित्र दिसून येत होते. जे काम पोलिस विभागाचे होते ते काम एकट्या पोलीस शिपायाने स्वबळावर केले असताना त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आवश्यक असताना त्याला शाबासकी देण्याऐवजी शिव्या व दुय्यम वागणूक मिळाल्याने पोलीस विभागात नेमके चालले तरी काय? पोलीस विभागात प्रामाणिक कर्मचारी/ अधिकारी यांना वावच नाही अशी उलट सुलट चर्चा सुरू आहे. प्रवीण रामटेके यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून त्यांची वरोरा पोलीस स्टेशन मधून हकालपट्टी तर होणार नाही ना? अशीही चर्चा रंगत आहे.
विशेष म्हणजे या अगोदर सुद्धा पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांनी टेभुर्डा येथील एका दारूवाल्या तस्करा विरुद्ध कारवाई केली असता तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याकडून सुद्धा त्यांना अशाच प्रकारची वागणूक देण्यात आली होती. त्यामुळे पोलिस विभाग हा अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र वरोरा शहरात दिसून येत आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या रामटेके यांना धाकदपट करणाऱ्या व त्यांनी एवढी मोठे कार्य स्वबळावर करूनही त्यांना सहकार्य न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यां विरुद्ध कडक कार्यवाही करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. तसेच पोलीस अधीक्षक साहेबांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन तस्करांना मदत करणाऱ्या पोलीस विभागातील भेदी विरुद्ध निलंबनाची कार्यवाही करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

( आलेख रट्टे :- चंद्रधून )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies