अधिष्ठाता कार्यालय व कामगार विभागाला मानवाधिकार आयोगाचा समन्स
दिनांक १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार
दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही -पप्पू देशमुख
चंद्रपूर:
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील ३७ दिवसांपासून जन विकास कामगार संघाचे नेतृत्वात वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील ५०० कोरोना योध्द्या कंत्राटी कामगारांचे मुलं-बाळं व कुटुंबासह डेरा आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील कामगारांची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतलेली आहे.चंद्रपुरातील विधिज्ञ अॅड. दिपक चटप तसेच जनविकास चे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी याबाबत दिनांक ९ मार्च २०२१ रोजी मानवाधिकार आयोगाकडे एक तक्रार केलेली होती. या तक्रारीची दखल घेऊन मानवाधिकार आयोगाने चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच उद्योग,उर्जा व कामगार विभागाचे कामगार आयुक्त यांना समन्स दिलेला आहे.अधिष्ठाता व कामगार आयुक्त यांना दिनांक १५ एप्रिल रोजी मुंबई येथे मानवाधिकार आयोगासमोर हजर राहण्यास या समन्सद्वारे सुचवण्यात आलेले आहे. तसेच अर्जदार देशमुख व अॅड.चटप यांना सुद्धा सुनावणी दरम्यान हजर राहण्याची सूचना केलेली आहे.
दरम्यान या नोटीसमुळे वैद्यकीय शिक्षण विभागात खळबळ उडालेली असून कामगारांचे थकीत पगार तसेच किमान वेतन देण्याच्या बाबत युध्द पातळीवर कार्यवाही सुरू झाल्याची माहिती मिळालेली आहे.
दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही...पप्पू देशमुख
थकित पगार व किमान वेतन मिळणे हा कामगारांचा कायदेशीर हक्क आहे. शासनाला तो द्यावाच लागेल. कामगारांच्या कायदेशीर हक्कासाठी 'जनविकास' ने 'कलम-कानून-कागज लेकर हल्लाबोल' आंदोलन सुरू केलेले आहे. मानवाधिकार आयोगाने अधिष्ठाता व कामगार आयुक्त यांना बजावलेला समन्स म्हणजे या आंदोलनाची एक झलक आहे.
मात्र वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील थकित पगारामुळे संगीता पाटील व प्रदीप खडसे या दोन कंत्राटी कामगारांचा नाहक बळी गेलेला आहे.जुने अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांनी कंत्राटी सेवा पुरविण्याच्या कामात भ्रष्टाचार केला व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी या भ्रष्टाचाराची उघडपणे पाठराखण केली.त्यामुळे दोन कामगारांना आर्थिक व मानसिक तणावाखाली आपला जीव गमवावा लागला.तसेच शेकडो कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. वर्तमान अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे यांच्या भोंगळ कारभारामुळे थकित पगाराचा प्रश्न सुटण्याऐवजी चिघळलेला आहे.
या सर्व दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिलेली आहे.