राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या केंद्रस्थानी सध्यातरी जिल्ह्यात दारू हाच विषय आहे. या विषयाच्या आडूनच अनेक अवैध व्यवसाय फोफावले आहेत.त्यातील कोळसा तस्करी एक. जिल्ह्यात कुंभार खैनी, सास्ती, पोवनी-2, पद्मापूर, लालपेठ, पैनगंगा , नीलजई -2 आणि कोलगाव आदी वेकोलिच्या कोळसा खाणी आहे. याच खाणीत कोळसा तस्करांचा सध्या धुमाकूळ सुरू आहे.
वेकोलि अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून रात्री कोळसा तस्करीचा काळा धंदा केला जातो. आणि याच काळात धंद्यातून जिल्ह्यात गॅंग वार सह गोळ्या घालून हत्या सुद्धा झालेले आहे. वीस ट्रक कोळसा काढण्याची परवानगी असेल तर तीस ट्रक कोळसा वेकोलितू बाहेर पाठविला जातो. शहराच्या वेशीवरील प्लॉटवर खाली केला जातो. पाच हजार रुपये प्रतिटन दराने तो खुल्या बाजारात विकला जातो. एकाच वाहतूक परवान्यावर अतिरिक्त कोळशाची वाहतूक केली जाते. यात शहरातील नामांकीत कोळसा व्यापारी आणि ट्रान्स्पोर्ट गुंतले आहे. पोलिसांचे त्यांना पाठबळ असल्याने कारवाई होत नाही.
दुसऱ्या प्रकारात रेल्वे वॅगनमधून जास्तीचा कोळसा संबंधित कंपन्यांना पाठविला जातो. एका रॅकमध्ये साधारणतः ऐंशी टन कोळसा बसतो. एका वॅगनमध्ये 56 रॅक असतात. यातील दहा ते बारा रॅकमधून अतिरिक्त कोळसा पाठविला जातो. मागील अनेक वर्षांपासून तस्करी सुरू आहे. परंतु अपवाद वगळता कारवाई होत नाही.
वेकोलिचे बडे अधिकारी, राजकीय नेते आणि तस्करांची श्रृखंला तयार झाली आहे. याच साखळीच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांच्या राष्ट्रीय संपत्तीची चोरी होत आहे. आता पोलिसांनी दारू सोबत कोळसा तस्करीवरही चाप लावण्याची गरज निर्माण झाला आहे.