चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा आर्थिक घोटाळा

चंद्रपूर :- जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये अनुकंपा द्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त जागांसाठी गेल्या काही महिन्या अगोदर मोठा घोटाळा उघडकीस आला होता. आणि बँकेच्या संचालकाला अटक करण्यात आली होती तेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँक चांगलीच चर्चेत आली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर शहरातील शाखेत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याचा आकडा तब्बल दीड कोटींवर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये रोखपाल पदावर असलेल्या व्यक्तीने ग्राहकांची फसवणूक केली असल्याची माहिती देण्यात आली असून ग्राहकांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता स्वतः खिशात टाकले. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या घटनेमुळे आता ग्राहकांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रोखपाल जिल्हा परिषद चंद्रपूर समोर असलेल्या बँक शाखेत गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत आहे.अपहाराचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. बँकेशी संलग्न एका सहकारी सोसायटीने या शाखेत भरायला दिलेली मोठी रक्कम खात्यात जमा न झाल्याने घोटाळ्याचे हे बिंग फुटले. काल रात्रभर बँकेच्या पथकाने या शाखेत चौकशी जारी ठेवली असून अंतर्गत चौकशी सुरू आहे पोलिसात तक्रार देण्यासाठी याची व्याप्ती पाहिली जात आहे.

याच पध्दतीने किती ग्राहकांना फसवले गेले याचा तपशील चौकशीत पुढे येणार आहे. सुमारे 4 महिन्यापूर्वी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना भ्रष्टाचार प्रकरणात चक्क तुरुंगाची हवा खावी लागली होती आणि त्यांना दूर करत नवी सत्ता विराजमान झाली आता नव्या कारभाऱ्यांच्या नाकाखाली कोट्यवधींचा अपहार झाल्याने बँकेची पुरती बदनामी झाली आहे.

दरम्यान, बँकेच्या या घोटाळ्यामुळे ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित की बुडाले अशी शंका आहे. यावर पोलीस तपास करत असून ग्राहकांच्या हिताचा विचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांनीही बँकेच्या संबंधी आपली सगळी माहिती आणि पैसे योग्यरित्या भरले जात आहेत की नाही याची तपासणा करणं महत्त्वाचं असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.Post a comment

0 Comments