सुगंधित तंबाखुचे व्यापारी अद्याप ही मोकाट !
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू व गुटख्यावर बंदी घातली आहे. मात्र, चंद्रपूर शहरात खुलेआम सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री होताना दिसत आहे. टाळेबंदीच्या कालखंडात तंबाखू व्यापाऱ्यांनी चांगलेच हात धुवून घेतले आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागाने डोळ्यावर काळी पट्टी बांधली की काय, असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शहरात बेरोजगार युवकांनी ठिकठिकाणी पानटपरीसारखे लहानसहान व्यवसाय थाटले आहेत. खर्रा खाणे युवकांची फॅशन झाली आहे. खर्रा बनविण्याकरिता सुगंधित तंबाखूची नितांत गरज आहे. याकरिता मजा 108, 120 व 160 असा सुगंधित तंबाखू वापरण्यात येतो.तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामामुळे महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूसह गुटख्यावर बंदी आणली आहे.
जिल्ह्याच्या सिमे लगतच असलेल्या आंध्र प्रदेश व तेलंगणातून चोरट्या मार्गाने बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची सर्रासपणे तस्करी होत असून, येथील काही व्यापारी त्यात लिप्त आहेत. तर बनावट मजा कंपनीचा जर्दा शहरातील बिंबा गेट परिसरात निर्माण करण्यात येत असल्याचा संशय पोलिस प्रशासनाला आहे.
रामनगर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी एका तंबाखू व्यावसायिकांवर कारवाई केली होती. प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला होता. सध्यस्थितीत येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या परिसर, भानापेठ वॉर्ड , गांधी चैक, पडोली, रयतवारी, नेहरूनगर ,इंदिरानगर, बिंबागेट व शहरातील ठराविक झोपडपट्टीत बंदी असलेला तंबाखू साठविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळी 'दीपक कि रोशनी में' सुगंधित तंबाखूची तस्करी करण्यात येत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शहरातील पानटपरीधारकांना जर्दा पोहोचविण्याकरिता काही युवक कार्यरत आहेत.
टाळेबंदीच्या कालखंडात दर गगनाला
टाळेबंदीच्या कालखंडात सुगंधित तंबाखूचा दर गगनाला भिडला होता, तर पाच रुपयांची तंबाखू पुडी 50 रुपयाला विकली गेली, तर खर्रा हा शंभरीवर पोहोचला होता, हे वास्तव विसरता येणार नाही. विशेष म्हणजे आजसुद्धा चढ्यादराने प्रतिबंधित तंबाखूची विक्री अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून होत आहे. मात्र, कारवाई करण्याचे सौजन्य संबंधित विभाग दाखवीत नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.