चंद्रपुरात मुबलक प्रमाणात रक्तसाठा

चंद्रपूर :- राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात मात्र याची मुबलकता दिसून येत आहे. रकदात्यांनी केलेल्या उत्स्फूर्त रक्तदानामुळं हा जिल्हा रक्ताच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून, आपत्कालीन स्थितीत इतर जिल्ह्यांना सुद्धा पुरवठा करण्याची क्षमता इथं निर्माण करण्यात आली.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजातून मोठ्या प्रमाणात रक्तदाते पुढे आले. राजकीय पक्षांनीही यात मोलाची मदत केली. त्यामुळं यावर्षभरात 269 शिबीर घेतली गेली. रुग्णांना रक्त किंवा प्लाजमा या दोन्हींची गरज वेळीच भागवली गेली. कोरोना काळ असल्यानं गंभीर रुग्णांना प्लाजमा थेरेपी आवश्यक असल्यानं 15 रुग्णांना ते देण्यात आलं.या जिल्ह्यात रोज किमान 50 बाटल्या रक्त गोळा होत आहे. महिन्याला सुमारे 1200 बाटल्या रक्त मिळत आहे. कोरोना रुग्णांना अपेक्षेप्रमाणे रक्ताची गरज पडलेली नाही. पण येत्या काळात केव्हाही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, हा विचार करून तशी व्यवस्था शासकीय रक्तपेढीनं करून ठेवली आहे.

'रक्ताच्या बाबतीत जिल्ह्याची स्थिती सुदृढ असल्यानं गरजेच्या वेळी गडचिरोली आणि अहेरी उपविभागाला इथून रक्त पुरवठा केला जातो. राज्यात आज घडीला रक्ताचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत कुठं इमर्जन्सी असेल, तर इथून पुरवठा करण्याची तयारीही इथल्या वैद्यकीय यंत्रणेची आहे, असे शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सांगितले आहे.

Post a comment

0 Comments