सोयाबीन काढत असताना मशीनमध्ये अडकल्याने युवकाचा मृत्यूसोनुर्ली :- थ्रेशरवर सोयाबीन काढत असताना मशीनमध्ये अडकल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील सोनुर्लीनजीक बेलगाव शेतशिवरात रविवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. आशिष वाघमारे असे मृतकाचे नाव आहे. सध्या शेतात सोयाबीन, धान काढणीचे काम सुरू आहे. अलीकडे सोयाबीन काढणीसाठी थ्रेशरचा वापर केला जातो. सोनुली येथील शेतकरी ईश्वर पडवेकर यांचे शेत बेलगाव शेतशिवरात आहे. मारोती बोबडे यांच्या थ्रेशर मशीनने रविवारी सोयाबीन काढले जात होते.
आशिष वाघमारे हा थ्रेशर मशीनवर मजूर म्हणून काम करीत होता. सकाळपासून काम सुरू असतानाच दुपारी २ वाजताच्या सुमारास मशीनमध्ये सोयाबीनच्या पेंढ्या टाकत असताना अचानक तो मशीनमध्ये ओढला गेला. मशीनमध्ये दबल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती कोरपना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळ गडचांदूर हद्दीत येत असल्याने प्रकरण
पुढील तपासासाठी गडचांदूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या घटनेमुळे सोनुर्ली व परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a comment

0 Comments