(कोरपना / प्रतिनिधी) मंगेश दिलीप तिखट
राजुरा :- कोरपना तालुक्यातील सोनुर्ली (वण) या गावात ओबीसी जनगणनेच्या जनजागृतीसाठी आज ३०० घरांवर 2021 ला जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसेल तर आमचा जनगणनेत सहभाग नसेल अशा आशयाच्या पाट्या लोकांनी उत्स्फूर्तपणे लावून आपला 26 नोव्हेंबरला होणाऱ्या विशाल मोर्चास पाठिंबा दर्शविला.गावातील तरुण मंडळीनी पुढे येऊन ओबीसी जनगणना जनजागृती आणि पाटी लावा मोहिम गावात राबविली. त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षणासाठी 26 नोव्हेंबर 2020 रोजी होणाऱ्या ओबीसींच्या विशाल मोर्चात सहभागी होण्यासाठी गावात घरोघरी फिरून तरुण युवकांनी जागृती करून मोर्चात येण्यासाठी आवाहन केले. ठीक - ठिकाणी दुकानावर,चौका चौकात बॅनर लावण्यात आले.
गेल्या नव्वद वर्षापासून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली नाही. सन १९३१ नंतर भारतात ओबीसी जनगणना झाली नसून, ओबीसी समाजाची अधिकृत आकडेवारी आजपर्यंत कळली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाज हा शासन दरबारी वंचित आहे. ओबीसी समाज हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० ते ६० टक्के असूनही भारतीय व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यप्रणाली मध्ये सहभागी करुन घेतले जात नाही.
ओबीसी प्रवर्गाची जनगणना झालीच तर शासनाच्या विविध योजना, विभागीय कार्यालय उदाहरणार्थ शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय याठिकाणी हक्क अधिकार देणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून ओबीसी जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठी सोणूर्ली (वण)येथील तरुण मंडळीने पुढाकार घेऊन पाटी लावा मोहीम सुरू केली होती.
यात गावातील युवक प्रभुदास वासाडे, प्रतीक डाखरे, रितेश डाखरे, प्रज्वल वैरागडे, रोहन बोधाले, गणेश पारखी, पवन मंदे यासह गावातील इतर तरुणांनी, गावातील नागरिकांनी सहकार्य करून ही ओबीसी जागृती मोहीम यशस्वीरीत्या राबवली.