Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे नियोजन परिपुर्ण


Ø संभाव्य दुसऱ्या कोरोना लाटेवर जिल्हाधिकारी यांचे कोरोना टास्क समितीला निर्देश

Ø ऑक्सीजन बेड, आयसीयु बेड व व्हेन्टीलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध

Ø दिल्ली, राजस्थान, गोवा व गुजरात येथून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कोरोना तपासणी

चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर : कोरोना महामारीसंदर्भात युरोपात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून दिल्ली व इतर काही राज्यात देखील दुसऱ्या लाटेची भीती वाढत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजन करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी सूचित केले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोविड रुग्णसंख्येच्या दहा टक्के अधिक रूग्णसंख्या गृहीत धरून आरोग्य सुविधांचे नियोजन करण्याबाबत कोरोना टास्क समितीची बैठकीत यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना टास्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी ॲन्टीजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याबाबत मनपा तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले. सध्या सुरू असलेले कोविड रुगणालये व तेथील मनुष्यबळ कमी न करता आहे तसेच सुरू ठेवण्याबाबत व सर्व रुग्णालयात आवश्यक औषधीचा मुबलक प्रमाणात साठा करून ठेवण्याविषयी त्यांनी यंत्रणेला कळविले. तसेच शासनातर्फे लस उपलब्ध झाल्यास त्याचा साठा करण्यासाठी आवश्यक तापमानाचे फ्रीजरच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालय येथे प्रत्येकी 20 किलो लीटर लिक्वीड ऑक्सीजन टँक लवकरात लवकर प्रस्थापीत करून सुरू करण्याविषयी अधिष्ठाता यांना सूचीत केले असता दोन्ही ठिकाणी लिक्वीड टँक लागले असून शासकीय रुग्णालयील ऑक्सीजन टँक येत्या पाच सहा दिवसात पुर्ण क्षमतेने सुरू होईल असे अधिष्ठाता डॉ. हुमणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 1780 ॲक्टीव रुग्णसंख्या आहे. तर कोरोनाची दुसरी लाट थांबविण्याच्या दृष्टीने 5454 ॲक्टीव रुग्णसंख्येचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी 2182 होम आयसोलेशनमध्ये, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण 2454, ऑक्सीजन खाटांची आवश्यकता असणारे 654, व्हेंटीलेटर वरील 82 व आयसीयुतील 82 रुग्णसंख्या असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

वरील अपेक्षीत रूग्णसंख्येप्रमाणे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी 1977 खाटा उपलब्ध असून 477 खाटांची कमतरता पडेल, मात्र ही कमतरता लवकरच भरून काढण्यात येईल. ऑक्सीजन खाटांची मागणी 654 अपेक्षीत आहे, त्या तुलनेत 823 खाटा उपलब्ध आहेत. तर व्हेंटीलेटर 82 अपेक्षीत असतांना 96 उपलब्ध आहेत. आयसीयु खाटांची संख्या 82 अपेक्षीत असतांना त्या 153 उपलब्ध आहेत.

जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 450 खाटांचे कोविड रूग्णालय प्रस्तावित आहे. त्यापैकी 50 ऑक्सीजन व 50 आयसीयु सह एकूण 100 खाटा स्थापित झाल्या असून उर्वरित 350 खाटांचे काम प्रगतीपथावर आहे व ते लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार आहे. तसेच सैनिक शाळा येथे कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये 400 ऑक्सीजन खाटांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून ऑक्सीजन पाईपलाईन व इतर साहित्य सामुग्रीची निविदा प्रक्रीया सुरू आहे. आवश्यकता भासल्यास या 400 खाटा देखील तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.

जिल्ह्यात शासकीय व खाजगी मिळून सध्या 7 कोविड रुग्णालये आहेत. तर 14 पैकी 12 कोविड हेल्थ केअर सेंटर व 23 पैकी 16 कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्या सेंटरमध्ये रुग्ण नाहीत ते पुर्णपणे बंद करण्यात आलेले नसून रुग्णसंख्या वाढल्यास तेथेही उपचार सुरू करण्यात येतील.

जिल्हयात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनानुसार प्रयोगशाळेत नियमित स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. फ्ल्यु सदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण करून शहरी व ग्रामीण भागात फिवर क्लिनिकव्दारे आयएलआय रुग्ण शोधुन त्यांचे स्वॅब घेण्यात येत आहे. पॉझीटिव्ह केसेसची जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसींग करण्यात येत आहे.

दुसरी लाट रोखण्याच्या दृष्टीने सुपर स्प्रेडर व्यक्तीची अतिशय महत्वाची भुमिका असल्यामुळे छोटे व्यवसायिक गट, घरघुती सेवा पुरविणारे, वाहतुक व्यवसायिक लोक, वेगवेगळी काम करणारे मजुर, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर व इतर कर्मचारी, हाउसिंग सोसायटी मध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक, आवश्यक सेवा पुरविणारे शासकीय, निमशासकीय तसेच पोलीस व होमगार्ड इ. जनसंपर्क अधिक असणाऱ्या व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण करून प्राधान्याने सदरील व्यक्तींची प्रयोगशाळा तपासणी करण्याचे नियोजन करण्याबाबतचे निर्देशही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिल्ली, राजस्थान, गोवा व गुजरात येथून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी करण्याबाबत शासनाच्या सूचना असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या सूचनेप्रमाणे ज्या प्रवाशांकडे प्रवासाच्या 96 तास अगोदरचे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट नसतील त्यांची रेल्वे स्थानकार तपासणी करण्यात यावी. कोरोना सदृष्य लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. यासाठी चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर रेल्वे स्थानकावर तपासणी पथक नेमण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तपासणी रिपोर्ट येईपर्यंत संबंधीत प्रवाशाला कोविड केअर सेंटरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यास गृह विलगीकरणाचा पर्याय देखील खुला असेल तसेच पॉझेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या प्रवाशांची माहिती रेल्वे प्रशासनास देउन कॉन्टॅक्ट ट्रेसीगद्वारे संबंधीतांना सूचित करण्याचे नियोजन अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यंत्रणेला दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies